दुधी – समज आणि गैरसमज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. गजानन एकबोटे

दुधी भोपळ्याप्रमाणेच इतर फळभाज्यांचे अनेक फायदे असले तरी कडू काकडी, कडू कलिंगड, कडू टरबूज, कडू दोडका, कडू लाल भोपळा यामध्ये जहरी विष आहे. त्यामुळे या फळभाज्यांच्या वापर करण्यापूर्वी त्यांची चव घेणे आवश्यक आहे. त्यांची चव घेतल्याशिवाय या फळभाज्यांचा अजिबात वापर करू नये. दुधी भोपळ्याचा रस इतर कोणत्याही फळांच्या रसामध्ये एकत्र करून घेऊ नये. त्यामुळे दुधी भोपळा कडू असेल तर इतर फळांच्या गोड रसामध्ये त्यांची चव झाकली जाते. दुधी भोपळ्याचा किंवा इतर फळभाज्यांचा रस घेण्यापेक्षा दुधी भोपळ्याची भाजी, कलिंगडाच्या फोडी, काकडीची कोशिंबीर हे खाणे केव्हाही चांगले.

आपल्या देशात अलीकडच्या काही वर्षांत दुधी भोपळ्याच्या रसाची बरीच प्रसिद्धी झाली आहे. रस घेणे आरोग्यदायी समजले जाते. रक्तदाब, मधुमेह, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि स्थूलपणा कमी करण्यासाठी दुधीचा उपयोग केला जातो, परंतु काही वेळा हाच रस गंभीर आजार उत्पन्न करू शकतो.

दुधी (शास्त्रीय नाव – लेजनारिआ सिसरारिआ) ही फळभाजी कुकुरबिटासी जातीची आहे. कधीतरी दुधी भोपळा कडू चवीचा निघतो. याचे कारण त्यात असलेला विषारी पदार्थ ‘कुकुरबिटासिन’ कडू दुधीचे सेवन केल्यास त्याचा परिणाम ताबडतोब पचनसंस्थेवर होतो. जठर आणि आतडी यांचा दाह होऊन त्यांच्यामध्ये रक्तस्राव होतो. त्यावेळी रक्तदाब खाली येऊन त्या व्यक्तीची हृदयक्रिया मंदावते. रक्ताची गुठळी बनण्याच्या क्रियेत दोष निर्माण झाल्याने शरीरातील कोणत्याही अवयवात रक्तस्राव होऊ शकतो. तातडीने उपचार न झाल्यास शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात आणि मृत्यू ओढवतो. दुधीचा रस काढून जास्त काळ सामान्य तापमानाला ठेवल्यास या विषारी पदार्थाची पातळी वाढते. पीक घेताना जमीन निकृष्ट असेल, दुधीस पाणी कमी मिळाले असेल किंवा उन्हाळी तापमान जास्त असेल तर दुधी भोपळा कडू निघण्याची शक्यता वाढते. ‘कुकुरबिटासिन’ या द्रव्याचे विष उतरवणारे औषध नाही.

याबाबतीतील वैद्यकीय उपचार हे लक्षणांवरून केले जातात. ते लागलीच केले पाहिजेत. कडू चवीच्या दुधीची शिजवून केलेली भाजी किंवा हलवासुद्धा त्रासदायक झाल्याची माहिती आहे. अन्नातील जंतू (Bacteria) हे अन्न उकळल्याने / शिजवल्याने नष्ट होतात. २०१०मध्ये दिल्लीमध्ये एका ज्येष्ठ शास्त्रज्ञाचा मृत्यू याच कारणाने ओढवला होता. त्याचवेळी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने यावर संशोधन करून सामान्य जनतेसाठी आणि डॉक्टरांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वांचा अहवाल तयार केला होता.

दुधी चिरताना प्रथम एक छोटा तुकडा खाऊन बघणे आवश्यक आहे. तो ‘कडू’ असल्यास तो दुधी वापरू नये. दुधीच्या रसात इतर फळभाज्यांचे रस (कारले, टोमॅटो, गाजर वगैरे) घालू नयेत. कारण त्यामुळे दुधीची चव समजून येणार नाही. या गटातल्या (कुकुरबिटासी परिवार) दुधी, काकडी, दोडका वगैरे भाज्या चिरताना त्यांची दोन्हीकडची टोके काढून टाकण्याची पारंपरिक पद्धत बरोबरच होती आणि आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस घेतल्यावर अस्वस्थ वाटू लागल्यास ताबडतोब हॉस्पिटल गाठावे आणि आपण रस घेतल्याची माहिती द्यावी. केव्हाही कोणत्याही भाजी अथवा फळांचे रस हे काढल्याबरोबर लगेच घेतले पाहिजेत. आजकाल आधीच कापून ठेवलेल्या भाज्या खरेदी करण्याची पद्धत वाढत आहे. तसेच मिश्र भाज्यांच्या तयार स्मूदी (मिश्र भाज्यांचा रस वा गर) पाऊचमध्ये मिळू लागल्या आहेत. यामुळे चुकून कडू दुधीचा किंवा काकडीचा तुकडा पोटात जायची शक्यता आहे.

या चर्चेच्या निमित्ताने आपण दुसऱया एका मुद्दय़ाची चर्चा करू. ज्या आहाराची आपल्याला पहिल्यापासून सवय आहे, जो आपल्या पचनी पडलेला आहे तो आहार आपण घेतला पाहिजे. हेल्थ क्लब, योग उपचार केंद्रे, निसर्ग उपचार केंद्रे, हास्य क्लब इ. वेगवेगळ्या पर्यायी उपचार पद्धती आणि सोशल मीडियामधून अहोरात्र मिळणारी माहिती यामुळे आपली विचारशक्ती बधिर होते. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार या विकारांमुळे आपण घाबरून गेलो आहोत. लोकांच्या मनात आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीबद्दल नकारात्मक भावना (अगदी सुशिक्षित लोकांमध्येही) दिसत आहे. आधुनिक वैद्यकीय औषधे घातक आहेत. मग बाकी उपचार पद्धती तरी सुरक्षित आहेत का? आपल्या प्रकृतीला कोणता आहार योग्य ठरेल, कोणता व्यवहार्य असेल आणि कायमस्वरूपी चालू ठेवणे शक्य होईल याचा विचार वैद्यकीय तज्ञांनी व लोकांनी करणे महत्त्वाचे आहे.
दुधी भोपळ्याप्रमाणेच इतर फळभाज्यांचे अनेक फायदे असले तरी कडू काकडी, कडू कलिंगड, कडू टरबूज, कडू दोडका, कडू लाल भोपळा यामध्ये जहरी विष आहे. त्यामुळे या फळभाज्यांच्या वापर करण्यापूर्वी त्यांची चव घेणे आवश्यक आहे. त्यांची चव घेतल्याशिवाय या फळभाज्यांचा अजिबात वापर करू नये. दुधी भोपळ्याचा रस इतर कोणत्याही फळांच्या रसामध्ये एकत्र करून घेऊ नये. त्यामुळे दुधी भोपळा कडू असेल तर इतर फळांच्या गोड रसामध्ये त्यांची चव झाकली जाते. दुधी भोपळ्याचा किंवा इतर फळभाज्यांचा रस घेण्यापेक्षा दुधी भोपळ्याची भाजी, कलिंगडाच्या फोडी, काकडीची कोशिंबीर हे खाणे केव्हाही चांगले.

दुधीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम, लोह इ.सारख्या मूलद्रव्यांचा मोठय़ा प्रमाणात साठा आहे. दुधी भोपळ्यामध्ये विरघळणाऱया फायबरचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दुधी भोपळा आपल्या जेवणातून वगळणे चुकीचे ठरेल.

दुधी भोपळ्यातील कुकुरबिटासिन या विषारी घटकांविषयी आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) जून २०११ मध्ये एक महत्त्वाचे संशोधन केले. त्यामध्ये दुधी भोपळ्यामधील विषारी घटकांमुळे आजारी पडलेल्या सुमारे २६ रुग्णांचा समावेश होता. या संशोधनाअंती खालील निष्कर्ष काढण्यात आले-

१. कडू दुधी भोपळा हे विष आहे. दुधी भोपळा कडू असेल तर त्याचा वापर जेवणाच्या पदार्थांमध्ये करू नये. दुधी भोपळ्याप्रमाणेच काकडी, कलिंगड, टरबूज, दोडका यांची पण वरीलप्रमाणे जेवणाचे पदार्थ बनविताना काळजी घ्यावी.
२. दुधी भोपळा, काकडी, लाल भोपळा, दोडका इ. फळभाज्या चिरताना त्यांची दोन्हीकडची टोके कापून टाकून मगच त्याचा वापर जेवणासाठी करावा.
३. अस्वस्थ वाटणे, जुलाब होणे, पोटात दुखणे, रक्ताच्या उलटय़ा होणे असे प्रकार दुधी भोपळा खाल्ल्याने जाणवू लागले तर ताबडतोब चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणे महत्त्वाचे आहे.
४. कडू दुधीमध्ये कुकुरबिटासिन जो विषारी पदार्थ असतो त्याचा प्रतिकार करणारे जगामध्ये कोणतेही औषध नाही. त्यामुळे अशा प्रकारची विषबाधा झालेल्या रुग्णांना योग्य उपचार देणे आवश्यक आहे.
५. कडू दुधीचे जरी दुष्परिणाम असले तरी चांगल्या प्रकारचा दुधी भोपळा वापरल्याने त्याचे अनेक फायदे होतात. त्यामुळे दुधी भोपळा, लाल भोपळा, काकडी, दोडका हे सर्वच टाकाऊ आहेत असा गैरसमज करू घेऊ नये. दुधी

भोपळा खालील गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त आहे-
– कॅन्सर, अतिसार इत्यादी
– पचनक्रिया सुधारणे
– वजन कमी करणे
– शरीरातील तापमान कमी करणे
– चांगली झोप येणे
– मूत्रविकार
– बद्धकोष्ठता
– रक्तदाब नियमित करणे
– लिव्हरची सूज कमी करणे
– अतिसार कंट्रोल करणे
– चेहऱयावरील फोड कमी करण्यासाठी
– रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी इत्यादी.

(लेखक पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शल्यचिकित्साशास्त्राचे प्राध्यापक तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष आहेत.)