प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन सीमाभाग गहिवरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने सीमाभागही गहिवरला. सीमाभाग पुन्हा एकदा पोरका झाल्याची भावना पसरली.

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते, विचारवंत, पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीतील नेते, तसेच बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी सीमाभागातील मराठी जनतेचे नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच मध्यवर्ती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ कोल्हापूरकडे धाव घेतली. रुग्णालयात जात आपल्या लढवय्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर, तालुका युवा समितीचे संतोष मंडलिक, दत्ता उघाडे, महेश जवेकर, सनील आनंदाचे आदींनी श्रद्धांजली वाहिली.

सीमाप्रश्न सुटेल हीच श्रद्धांजली!
सीमाभागात फक्त ‘एन.डी.’ या दोन अक्षरांचा उल्लेख झाला तरी मराठी भाषिक सतर्क होऊन स्वाभिमानाने कामाला लागत. ‘कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषिकांना न्याय मिळवून देणारच!’ असा त्यांचा दुर्दम्य विश्वास होता. लढय़ात प्रत्यक्ष सहभाग घेऊन लाठय़ाकाठय़ा झेलल्या, तुरुंगवास भोगला. त्यानंतरही मराठी भाषिकांचा पाठपुरावा करीत ‘लढा… लढत राहा… यश निश्चित आहे!’ असे आश्वासक उद्गार काढणारे एक दुर्दम्य लढाऊ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र पूर्ण करण्यासाठी सीमावासीयांनी प्रयत्न करणे, हीच त्यांना आदरांजली ठरेल. बेळगाव प्रश्न सुटेल त्याच वेळी त्यांना श्रद्धांजली ठरेल.’
– दीपक दळवी, अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती.

हुतात्मादिनी आणखी एक हुतात्मा!
‘सीमाप्रश्न सुटावा, यासाठी एन. डी. पाटील यांनी 1956 पासून केलेले प्रयत्न सर्वांना माहीत आहेत. आपल्या हयातीत बेळगाव महाराष्ट्रात सामील व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या निधनामुळे सीमावासीयांचा मोठा आधार हरपला आहे. 17 जानेवारी हुतात्मादिनी त्यांच्या निधनाची बातमी कळली. त्यामुळे सीमाप्रश्नासाठी आणखी एक हुतात्मा एन. डी. पाटील यांच्या रूपाने झाला आहे.
– मनोहर किणेकर, माजी आमदार