
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा विषय गंभीर झाला आहे. केडगाव शिवसैनिकांच्या हत्याकांडाचा तपास तसेच माझ्या संदर्भात हद्दपारीच्या काढलेल्या नोटीसीचा जाब विचारण्यासाठी लवकरच विधानभवनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला आहे.
राठोड म्हणाले की, दरवेळी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकारणामध्ये तसेच समाजकारणामध्ये पंचवीस वर्षापासून आमदार तसेच तीन वेळेला महापौर असे विविध पदे या नगर शहरांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मिळाले आहेत. नुकतीच झालेल्या महापालिका पदाच्या निवडणुकीत सुद्धा 24 जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व नगर शहरामध्ये कायम आहे. पण अलीकडच्या काळामध्ये पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर सुरू केला असून काल आपल्याला हद्दपारीची नोटीस दिली आहे, त्याला उत्तर दिले आहे. वास्तविक पाहता अशा नोटिशींना घाबरत नाही पण एक प्रकारे माझ्यावर कारवाई केल्यावर कार्यकर्ते भयभीत होतील, असे वातावरण तयार करायचे असा पोलिसांचा उद्योग सध्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
गणेशोत्सव काळात सुद्धा शिवसेनेचा गणेश मंडप तोडण्यात आला. हे कृत्य ज्या नायर या अधिकाऱ्यांनी केले त्याला कोणताही अधिकार नसताना व त्याची थेट सरकारने नियुक्ती महापालिकेत केलेली नसताना अशा प्रकारचे कृत्य त्याला करता येते का आम्ही या संदर्भातील सुद्धा माहिती घेत आहोत. आम्ही त्याच्याविरुद्ध लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केडगाव येथील हत्याकांडाचा विषय झाल्यानंतर दगडफेकीचा उल्लेख करून कलमे लावली त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता आमच्या दोन शिवसैनिकांची हत्या झाली त्याचं पोलिसांना काही देणेघेणे नाही. पोलीस तपासामध्ये ज्यांची ज्यांची नावे निष्पन्न झाली आहेत त्यांच्यावर अद्यापर्यंत कोणतीच कारवाई केली नाही आणि कुणाला काही अटक केले नाही. उलट समोरच्या पार्टीकडून मलिदा घेऊन तपास करायचा नाही अशी भूमिका घेतली असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.
आजही त्या दोन कुटुंबाला न्याय मिळू शकलेला नाही. पोलीस हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात हे पुन्हा उघड झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. केडगाव हत्याकांडातील कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या कुटुंबाच्या समवेत लवकरच विधानभवनासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात अनिल राठोड यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, संभाजी कदम, विक्रम राठोड, योगीराज गाडे आदी उपस्थित होते.
































































