नगर – सात व्यक्तींचा ‘कोरोना संसर्ग’ अहवाल निगेटीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हा एकवटला असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांना जिल्हावासियांनीही प्रतिसाद दिल्याने हा धोका आपण टाळू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. महत्वाच्या संस्था, देवस्थाने, आस्थापना यांनी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने तेथील गर्दी ओसरली आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी झाली तर हा प्रादुर्भाव आटोक्या येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी आज 7 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले. अजून 06 व्यक्तींचा नमुना अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 42 व्यक्तींची तपासणी जिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आली असून त्यापैकी 37 जणांना त्यांची नमुना चाचणी निगेटीव आल्याने घरी सोडण्यात आले असून त्यांना तेथे घरी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बुधवारी आणखी 14 व्यक्तींचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून या व्यक्तींना जिल्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, परदेशातून परत आलेल्या व्यक्तींची केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी केली जात आहे. इतर कोणत्याही रुग्णालयात नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी केवळ जिल्हा रुग्णालयातच तपासणी करुन घ्यावी. याबाबत कोणत्याही अफवा अथवा खोटी माहिती पसरवणार्‍यांवर पोलिसांचा सायबर सेल कारवाई करेल, असे द्विवेदी यांनी स्पष्ट केले.