
नगर जिल्ह्यात उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावलेले, फरार असलेले, तसेच स्टॅण्डिंग वॉरंटमधील पाहिजे असलेले अशा तब्बल 4682 आरोपींपैकी 1163 आरोपींचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. 1 जानेवारीपासून यासाठी विशेष मोहीम राबवून तब्बल 798 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
अधीक्षक पाटील म्हणाले, ‘जिह्यात मोठय़ा प्रमाणावर आरोपी फरार होते. 1 जानेवारीपर्यंत आढावा घेऊन विशेष मोहीम राबविण्याचा आदेश स्थानिक गुन्हे शाखा व जिह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकाऱयांना दिला होता. त्यानुसार 6 मार्चपर्यंत फरार असलेले 16, पाहिजे असलेले 1086, स्टॅण्डिंग वॉरंटमधील 59 व उच्च न्यायालयात शिक्षा झालेले 2 अशा एकूण 1163 आरोपींचा शोध लावण्यात आला. त्यांतील 798 आरोपींना प्रत्यक्ष अटक करण्यात आली, तर 35 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तसेच 39 आरोपींचा मृत्यू झाला असून, 291 आरोपींचे खटले न्यायालयात निकाली निघाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मृत आरोपींबाबत कागदपत्रे जमा करणे, अटकेत असलेल्या आरोपींची माहिती संकलित करणे यासाठीही पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी विशेष परिश्रम घेतले. जिह्यात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आरोपींचा शोध लावून त्यांना अटक करण्यात आल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
अटक केलेल्या आरोपींमध्ये ‘मोक्का’च्या गुह्यातील 4, खुनाच्या गुह्यातील 24, खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुह्यातील 58, दरोडय़ातील 55, जबरी चोरी 106, घरफोडीच्या गुह्यातील 130 आरोपींचा समावेश आहे. पकडलेल्या आरोपींपैकी पाचजण 1980 ते 1990च्या काळातील दाखल गुह्यांतील आहेत. 1991 ते 2000 या कालावधीतील 72, 2001 ते 2010 या काळातील 136, 2011 ते 2015 या काळातील 237, तर 2016नंतरच्या 713 आरोपींचा समावेश असल्याचे अधीक्षक पाटील म्हणाले.
चांगली कामगिरी करणाऱया पोलीस ठाण्यांना पारितोषिक
जिह्यातील राजूर पोलीस ठाणे 55 टक्के, तोफखाना पोलीस ठाणे 35 टक्के (75 आरोपी) व नगर तालुका पोलीस ठाण्याने 40 टक्के (70 आरोपी) आरोपींचा शोध लावला. चांगली कामगिरी करणाऱया अशा पोलीस ठाण्यांना पारितोषिक देणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. जिह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी चांगली कामगिरी केल्याचेही ते म्हणाले.




























































