
सामना प्रतिनिधी। कोल्हार
सरत्या वर्षाला निरोप देत असताना कोल्हार मध्ये कुंकुलोळ व्यापारी संकुलातील रेडिमेड कापडाच्या दुकानास सकाळीच अचानक आग लागल्याने दुकानातील सर्व कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले. अग्नीशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही.
मुंबईतील आगीचे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले असून राहाता तालुक्यातील कोल्हार येथील झुंबरशेठ कुंकुलोळ संकुलात पहिल्या मजल्यावरील ऋतुराज रेडिमेड या कपड्याच्या दुकानात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानक आग लागून आगीचे धूर बाहेर येऊ लागले यावेळी दुकानाचे चालक राकेश पवणे हे दुकान उघडून बाहेर गेले होते. आग वाढत असल्याचे निदर्शनास येत असल्याने अर्बन बँकेचे कर्मचारी भारत खर्डे यांनी तातडीने अर्बन बँकेतील व कार्पोरेशन बँकेतील पंप घेऊन दुकानाकडे धाव घेतली व स्थानिकांच्या मदतीने दुकानाच्या काचेचा दरवाजा तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग धुमसून आगीचे लोळ बाहेर येत असल्याने स्थानिकांनी व स्वप्नील निबे यांनी तातडीने विविध ठिकाणी संपर्क साधून अग्नीशमन दलास पाचारण केले.
प्रवरेचे तीन व राहुरी व राहाता नगरपालिकेचे एकूण पाच बंब घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळविले परंतु सुमारे एक तास धुमसत असलेल्या आगीने दुकानातील कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाले. सदर आगीत किती रुपयांचे नुकसान झाले व आग कशामुळे लागली हे आद्यप स्पष्ट झालेले नाही.
आग लागल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील नागरिकांना प्रथम स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले तसेच आजू बाजूचा परिसर रिकामा केला त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र दुकानातील कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता आग विझविल्यानंतर दुकानात केवळ राखेचा ढिगारा शिल्लक होता.
































































