नगर- नोकरीचे आमिष दाखवून 17 लाखांची फसवणूक

282

शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो असे सांगून विश्वास संपादन करून 17 लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना घडली आहे. ही घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर, आलमगीर रोड, विजयनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाण येथे 31 जुलै 2013 ते 2016 या दरम्यान घडली.

भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, सचिव अनिल तुळशिराम शिंदे, उपाध्यक्ष मंगला अनिल शिंदे व सदस्य राजु बन्सी साळवे, संजय बन्सी साळवे, रेखा सुजय साळवे यांनी रूषाली गणेश होळकर आणि रूषाली गणेश कुलट यांना शिक्षिका या पदावर नियुक्ती करतो, असे सांगुन मुलाखत घेऊन तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर दिली व वेळेवर पगार मिळण्याची हमी दिली. त्यानंतर त्यांनी संगनमत करून रूषाली होळकर यांच्याकडून काही रक्कम घेतली. तसेच शासनाची ऑर्डर मिळवून देवू असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर होळकर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन व पगार न देता त्यांची फसवणुक केली. होळकर यांनी पगाराची व दिलेल्या पैशांची एकूण रक्कम 17 लाख रूपयांची मागणी केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दम दिला. या प्रकरणी होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 504, 506, 34 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बेंडकोळी हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या