आषाढी वारीमुळे कांद्याची आवक घटली, पारनेर बाजार समितीत साडेतीन हजार कांदा गोण्यांची आवक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर बाजार समितीत कांद्याची आवक काही प्रमाणात घटली असून, शेतकऱयांनी सुमारे 3 हजार 537 कांदा गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. सध्या आषाढी वारीला अनेक शेतकरी पंढरपूरकडे जात असल्याने आवकेवर परिणाम झाला असून, मागील आठवडय़ापेक्षा 500 कांदा गोण्यांची आवक घटली. पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी झालेल्या लिलावात 7 ते 8 लॉटला सर्वाधिक प्रतिक्विंटल 1400 ते 1650 रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला.

नगर जिल्ह्यात मागील रब्बी हंगामात 1 लाख 90 हजार 529 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. यातून जिल्ह्यात 37 लाख 98 हजार 195 टन कांद्याचे उत्पादन झाले होते. कांद्याच्या उत्पादनासह उत्पादकतेतही वाढ झाली होती; परंतु तीन महिन्यांपासून कांद्याच्या भावात कमालीची घट झाली. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नसल्याचे चित्र होते.

भावातही झाली घट; सर्वाधिक 1650 रुपयांपर्यंत मिळाला भाव

यंदा कांद्याच्या उत्पादकतेतही वाढ झाली होती; परंतु तीन महिन्यांपासून कांद्याच्या भावात कमालीची घट झाली. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नसल्याचे चित्र होते. परंतु, मागील आठवडय़ात खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी नाईलाजास्तव कांदा विक्रीसाठी काढत होते. मात्र, सध्या आषाढी वारीसाठी शेतकरी पंढरपूरकडे जात असल्याने पारनेर बाजार समितीत कांदा आवक घटली. पारनेर बाजार समितीमध्ये रविवारी (3 जुलै) कांद्याचे लिलाव झाले. यावेळी सुमारे 3 हजार 537 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यातील 7 ते 8 लॉटला प्रतिक्विंटल सर्वाधिक म्हणजे 1400 ते 1650 रुपये भाव मिळाला. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला, तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 700 ते 900 रुपये भाव मिळाला, तर तीन नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 200 ते 600 रुपये भाव मिळाल्याची माहिती पारनेर बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी काढत नाहीत. त्यातच सध्या आषाढी वारीसाठी शेतकरी पंढरपूरला पायी वारीने गेले आहेत. त्यामुळे कांद्याची आवक घटली आहे. पारनेर बाजार समितीत 26 जून रोजी 4 हजार 50 कांदा गोण्यांची आवक झाली होती; परंतु रविवारी (दि. 3) 3 हजार 537 कांदा गोण्यांची आवक झाली. आषाढी वारीनंतर पुन्हा कांद्याची आवक वाढू शकते.                                                                            

शिवाजी पानसरे, सचिव, बाजार समिती, पारनेर.