
तब्बल सात वर्षांनी निवडणूक होत असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट-शेडय़ुल्ड बँकेची आर्थिक स्थिती डबघाईस आल्यासारखी असल्याने निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा मध्यंतरी होती. मात्र, आता ही शक्यता धूसर होऊ लागली आहे. बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान होऊ लागल्या आहेत. बरखास्त झालेल्या संचालक मंडळ व नगर अर्बन बचाव कृती समितीसह आणखीही काहीजणांनी पॅनलची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
नगर अर्बन बँकेच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. यासाठीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, यावर आलेल्या हरकतींची सुनावणी बुधवारी (दि. 20) झाल्यावर 22 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. सुमारे 56 हजार मतदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून, 12 नोव्हेंबरला अर्ज माघारीची अखेरची मुदत आहे. याच दिवशी निवडणूक बिनविरोध होणार की दोन-तीन पॅनल रिंगणात असणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बँकेच्या 18 जागांसाठी मागील वेळी दोन पॅनल रिंगणात होते. त्यात तत्कालीन खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनल व ऍड. अशोक कोठारी, सुभाष भंडारी यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल अशी सरळ लढत झाली. त्यात गांधी यांच्या पॅनलने सर्व 18 जागा जिंकून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले होते. या पार्श्वभूमीवर या पॅनलच्या समर्थकांनी आता नव्याने पॅनल जुळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मागच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व करणारे दिलीप गांधी व सुवालाल गुंदेचा यांच्या पश्चात बँकेवर त्यांच्या समर्थकांचे वर्चस्व कायम ठेवण्याच्या उद्देशाने या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही निवडणुकीत आपले पॅनल उतरविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. बँक बचाव आघाडीही मैदानात उतरण्याच्या तयारीत असून, बँक बचावचे राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, अच्युत पिंगळे, मेहुल भंडारी, पोपट लोढा आदी प्रमुखांकडून भेटीगाठींचे सत्र सुरू आहे.
नगर अर्बन बँकेची आर्थिक स्थिती अडचणीची आहे. साडेचारशे कोटींवर एनपीए गेला आहे, अशात सात वर्षांनी जाहीर झालेल्या निवडणुकीचा सुमारे दीड-दोन कोटींचा खर्च वाचवणे गरजेचे असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली असली, तरी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या वेगाने घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळल्यातच जमा असल्याचे सांगितले जात आहे.



























































