
प्रोफाईल अपडेटिंगचे काम प्रगतिपथावर; 153 शिक्षकांच्या चुका दुरुस्त
जिल्हा परिषदेत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात प्रोफाईल अपडेटचे काम सुरू आहे. या प्रोफाईलमध्ये शिक्षकांकडून तारखांसह, नावात, आधार क्रमांक, नोकरीत रुजू होण्याची तारीख यासह नजरचुकीने काही चुका झाल्या होत्या. त्या दुरुस्तीसाठी 153 शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱयांकडे अपील केले होते. शिक्षणाधिकाऱयांनी या अपिलाची तपासणी करून दुरुस्त्या केल्या आहेत. यामुळे शिक्षकांच्या आता बदलीच्या पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
दोन वर्षांनंतर शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त सापडला असून, चालू जुलै महिन्यांत बदल्या होण्याची शक्यता आहे. यंदा बदल्यांसाठी ऑनलाइन पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाने बदलीपात्र शिक्षकांची माहिती मागविलेली होती; परंतु तरीही प्रोफाईलमध्ये काही बदल करायचा असल्यास शिक्षकांना 20 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात संबंधित शिक्षकाला स्वतःचे नाव, आधार क्रमांक, पॅन कार्ड, जन्मतारीख, नियुक्तीची तारीख, विद्यमान नियुक्तीचे ठिकाण आणि सेवाविषयी माहिती अपडेट करता येणार होती. त्यानुसार शिक्षकांनी हे बदल केले. मात्र, जन्मतारीख किंवा नियुक्तीची तारीख भरताना अनेकांकडून त्यात चुका झाल्या. आधी तारीख की महिना टाकायचा यात गोंधळ झाल्याने चुका झाल्या. हे प्रोफाईल गटशिक्षणाधिकाऱयांनी तपासले असता या चुका लक्षात आल्या. त्यामुळे त्या चुका दुरुस्तीसाठी 153 शिक्षकांनी शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्याकडे अपील केले. पाटील यांनी सर्व शिक्षकांच्या या चुका दुरुस्त करून प्रोफाईल अपडेट केली आहे.
सार्वजनिक आक्षेपांवरही होणार सुनावणी
याशिवाय शिक्षकांना इतर शिक्षकांचेही प्रोफाईल पाहाता येणार असून, त्यावर सेवाज्येष्ठता किंवा इतर काही आक्षेप घेता येणार आहेत. त्यासाठी 24 जून ते 3 जुलै असा कालावधी असून, या सार्वजनिक आक्षेपांवर 4 व 5 जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेणार आहेत.
एकाच टेबलावर 3 वर्षे, विभागात 5 वर्षे काम करणाऱयांच्याही बदल्या
जिल्हा परिषदेत आवडीची खाती व टेबल नेहमीच चर्चेचा विषय असतो. शासनाच्या निर्देशानुसार एकाच टेबलवर तीन वर्षे काम करणारे तसेच एकाच विभागात पाच वर्षे सेवा करणाऱया कर्मचाऱयांचे स्थानांतरण करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. 2020 व 2021 या दोन वर्षांत लॉकडाऊन तसेच मोजक्याच कर्मचाऱयांमध्ये प्रशासकीय कार्यालये सुरू होती. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील कक्ष अधिकाऱयांच्या बदल्यांसह कर्मचाऱयांचे स्थानांतरण रखडले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी स्थानांतरणाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्यालय तसेच पंचायत समित्यांमधील 55 कर्मचाऱयांची यादी निश्चित करण्यात आली आहे.































































