500 रुपयांऐवजी निघायचे अडीच हजार! नागपुरातील ‘एटीएम’चा चमत्कार, पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूर जिह्यातील खापरखेडा गावात एका एटीएममधून 500 रुपये विड्रॉल टाकल्यावर एटीएम मशीनमधून चक्क 2 हजार 500 रुपये विड्रॉल होत असल्यामुळे मंगळवारच्या पहाटे परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. खापरखेडा गावातील शिवा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या ऑक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये ही किमया घडत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक तरुणांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून एटीएम मशीनमधून अडीच हजार रुपये मिळविले. जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस ऑक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर पोहोचले आणि त्यांनी शटर डाऊन करत एटीएम सेंटर बंद केले.

या एटीएमच्या बाजूला एसबीआय आणि एचडीएफसी बॅंकेचेही एटीएम आहे. खापरखेडा येथील काही लोकांनी ऑक्सिस बँकेच्या एटीएमसमोर गर्दी असल्यामुळे इतर मशीनमधून पैसे काढून निघून गेले.

सिल्लेवाडा येथील एक तरुण एच.डी.एफ.सी.च्या एटीएममधून दहा हजार रुपये काढून परत जात असताना कोराडी येथील एक युवक त्याच्याजवळ आला. त्याने त्याला 500 रुपये मागून 1 हजार रुपये देतो असे सांगितले. तरुणानेही त्याला पैसे दिले. यानंतर तो युवक एटीएममधून अडीच हजार रुपये घेऊन आला आणि तरुणाने त्यातील हजार रुपये दिले. त्याने सर्व प्रकार सांगून पैसे काढून दाखविले.

कडक पोलीस बंदोबस्त

पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराबाबत माहिती दिली, त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी बुधवारी तिथे पोहोचून एटीएम मशीनची तपासणी केली. दरम्यान, किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. मध्यरात्रीनंतर ही माहिती परिसरात पसरल्याने तीन वाजेपर्यंत नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी या एटीएम सेंटरकडे पैसे काढण्यासाठी तोबा गर्दी केली. मात्र येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे, या एटीएमवर पैसे काढल्यानंतर मोबाईलवर बँकेतून कोणताही मेसेज आला नाही.