नागपुरात बलात्काराच्या 2 घटना; विधिसंघर्षग्रस्त मुलगा ताब्यात, प्रियकराला अटक

1165
प्रातिनिथिक फोटो

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका चिमुकलीसह तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल करून विधिसंघर्षग्रस्त मुलगा ताब्यात घेऊन प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन चिमुकली आई-वडिलांसह भाड्याच्या घरात राहते. त्याच घरी शेजारी आरोपी 17 वर्षीय विधिसंघर्षग्रस्त मुलगादेखील राहतो. दोघेही शेजारी राहत असल्याने मुलगी आरोपीच्या घरी ये-जा करीत होती. रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मुलीची आई घराच्या मागील बाजूला कपडे धूत होती. त्यावेळी मुलगी खेळण्यासाठी आरोपीच्या घरी आली होती. अचानक शेजारच्या घरातून मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिने दाराच्या फटीतून पाहिले असता आरोपी मुलीसोबत नको त्या अवस्थेत दिसला. तिने लगेच आरोपीच्या घरात जाऊन मुलीला ताब्यात घेतले. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी 376 (अ) (ब), पोक्‍सो कायदा 4, 6, 8, 10 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3, 1 आरएसडब्ल्यू अन्वये गुन्हा दाखल करून विधिसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे.

दुसऱ्या घटनेत 22 वर्षीय प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी प्रियकर आलम काजी मोहम्मद काजी (22, रा. गरीब नवाजनगर, नागपूर) यास अटक केली आहे. 23 एप्रिल 2018 ते 14 डिसेंबर 2019 दरम्यान ही घटना घडली. पीडित तरुणी आणि आरोपी आलम काजी हे दोघे सदर येथील एकाच महाविद्यालयात शिकत होते. दरम्यान, त्यांचे प्रेमसंबंध जुळले. आलमने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याच घरी तिचे लैंगिक शोषण केले. तरुणीने लग्नाची गळ घातली असता त्याने लग्नास नकार दिला. पीडितेला मारहाणदेखील केल्याचे तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी आलमला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

विधिसंघर्षग्रस्त मूल म्हणजे काय?
मूल गुन्हेगार नसतं, तर विशिष्ट परिस्थितीत मूल गुन्ह्याचं कृत्य करतं आणि त्यामुळं त्याला कायद्याच्या प्रकियेतून जाणं अनिवार्य होतं, यासाठी कायदा त्याला विधिसंघर्षग्रस्त मूल म्हणतो. बऱ्याचदा या मुलांना सुधारण्याची संधी दिली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या