नायरमधील कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लक्षणे!

पालिकेच्या नायर रुग्णालयात काम करणाऱया आणि कोरोनामुक्त झालेल्या तीन डॉक्टरांमध्ये कोरोनाची पुन्हा लक्षणे दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांना नायर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या स्वॅबचे नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती नायर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या डॉक्टरांमध्ये पुन्हा लक्षणे आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरात कोरोनाचा सामना करणाऱया अँटिबॉडीज तयार होतात. यामुळे एकदा कोरोना होऊन गेल्यावर पुन्हा त्याची लागण होत नाही असा दावा आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आला आहे. मात्र नायरमधील तीन डॉक्टरांमध्ये कोरोनामुक्त झाल्यानंतर 65 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशा लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा लागण कशी झाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचा प्रकार पहिल्यांदा ऑगस्टमध्ये हाँगकाँगमध्ये समोर आला होता. यात 33 वर्षीय आयटी प्रोफेशनलच्या व्यक्तीला पुन्हा लागण झाली होती. तर हिंदुस्थानात सप्टेंबरमध्ये 27 वर्षीय महिलेला पुन्हा कोरोना झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, नायर रुग्णालयातील तीन डॉक्टरांसह मुंबईतील आणखी एका खासगी रुग्णालयातील कोरोनामुक्त झालेल्या आरोग्य कर्मचाऱयाला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले आहे.

‘नायर’मध्ये 300 डॉक्टर-नर्स कोरोनामुक्त!
– पालिकेच्या नायर रुग्णालयात कर्तव्य बजावणाऱया 300 आरोग्य कर्मचाऱयांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांचा समावेश आहे. यातील सर्व कोविड योद्धय़ांनी कोरोनावर मात केली असून पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली आहे.
– मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात तातडीने व्यवस्था करून संपूर्ण रुग्णालय कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय प्लाझ्मा केंद्रासह कोरोना पॉझिटिव्ह मातांसाठी खास व्यवस्था सुरू करण्यात आली.

डॉक्टर म्हणतात…
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. मात्र अपवादात्मक स्थितीत काही रुग्णांमध्ये कोरोना विषाणू ‘म्युटेड’ (सुप्त) स्वरूपात शिल्लक राहू शकतो. जो पुन्हा काही दिवसांनी कोरोनामुक्त झालेल्या संबंधित रुग्णाच्या शरीरात पुन्हा सक्रिय होऊ शकतो. याला ‘री-इन्फेक्शन’ असे म्हटले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या