विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार, मनोरुग्णालयातील 724 झाडांवर कुऱ्हाड

 नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद सर्वत्र गाजत असतानाच आता ठाण्याच्या ब्रिटिशकालीन मनोरुग्णालयाच्या आवारात असलेल्या 724 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. विकासकामांच्या नावाखाली वृक्षवल्लीची कत्तल होणार असल्याने शहरातील वृक्षप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही झाडे तोडण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली असून मनोरुग्णालयाच्या आवारातील हिरवाई नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाण्यातील मनोरुग्णालय हे अतिशय जुने असून तेथे महाराष्ट्राच्या विविध भागातील मनोरुग्ण उपचार घेत आहेत, तर अनेक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरीदेखील परतले आहेत. या मनोरुग्णालयाचा कायापालट करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याशिवाय मुलुंड-ठाणेदरम्यानच्या विस्तारित रेल्वे स्थानकाचे कामही मनोरुग्णालयाच्या आवारात केले जात आहे. या कामाच्या आड येणारी शेकडो झाडे तोडली जाणार आहेत. त्यापैकी 421 वृक्षांचे पुनर्रोपण करू, असा दावा संबंधित ठेकेदाराने केला आहे, पण प्रत्यक्षात ही झाडे कुठे व कशी लावणार याचा काहीच पत्ता नाही.

मनोरुग्णालय परिसराबरोबरच ठाणे शहरातील ढोकाळी, कोलशेत येथील विकासाच्या आड येणारी 193 झाडे तोडण्याची परवानगी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली आहे. मनोरुग्णालयाच्या आवारात 1 हजार 616 विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. काही झाडे तर 70 ते 80 वर्षांहून जुने असून ती आता नामशेष होणार आहेत.

ही दुर्मिळ झाडे तोडणार

फणस, उंबर, बदाम, सुरु, चाफा, आंबा, अशोका, कैलासपती, गुलमोहर, कडुनिंब, सोनमोहर, सुबाबुळ, जांभुळ, बेहरी माड, अनंता, निलगिरी, सिंगापूर चेरी, करंज, रेन ट्री, शिवण, बकुळ, बहावा, शेवगा, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, रामफळ आर्दीसह इतर महत्त्वाच्या झाडांवर कुन्हाड चालवली जाणार आहे.

कासारवडवलीतील तोडलेली झाडे कुठे गेली?

घोडबंदर रोडवरील कासारवडवली या भागात रस्ता रुंदीकरणाचे काम करताना ठेकेदाराने शेकडो झाडांची कत्तल केली. त्यातील काही झाडांचे पुनर्रोपण करणार असल्याचा दावा ठेकेदाराने केला होता, पण प्रत्यक्षात एका रात्रीत सर्व झाडे तोडून ती गायब केली आहेत. ही झाडे नेमकी कुठे गेली याचे उत्तर कुणाकडेच नसल्याचे दिसून आले आहे.