Video – बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे. हा भाजपचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहावत नसून त्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजपवर शरसंधान केले.

विदर्भ दौऱयावर असलेल्या नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, सत्तेपासून वंचित राहिल्याने  केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम मागील दीड वर्ष भाजप पद्धतशीरपणे करत आहे. विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर करून आवाज दाबण्याचे प्रकार सुरू आहेत; परंतु भाजपचे सत्तेत येण्याचे दिवास्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कोणत्याही दबावाला हे सरकार बळी पडणार नाही.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जातोय

केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही ते स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱयावरून विरोधकांवर दबाव आणण्याचे काम भाजप करत आहे. ईडीच्या माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातूनही वारंवार उघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारच्या कामावर लोक समाधानी – नवाब मलिक

विरोधकांना एकत्र आणणे हाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा अजेंडा असणार आहे. मोजके पक्ष सोबत नाहीत; पण हळूहळू त्यांना एकत्र कसे आणता येईल, हे सांगतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षे काम करणार आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल या आशेवर भाजप दररोज एक एक नवीन नवीन विषय काढत आहे. आज-उद्या सरकार पडेल अशी एक एक तारीख सांगत आहे; मात्र त्यांची एकही तारीख योग्य ठरत नाही किंवा त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर उभारण्यात आले आहे. सरकारच्या कामावर लोक समाधानी आहेत. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.

भाजपविरोधात कोणतीही आघाडी काँग्रेसशिवाय शक्य नाही

2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत; पण भाजपविरोधात कोणतीही आघाडी उभी करायची असेल तर ती काँग्रेस पक्षाशिवाय होणे शक्य नसल्याचे नाना पटोले म्हणाले.

सरकार पाच वर्षे चालवण्यासाठी तिन्ही पक्ष बांधील – संजय राऊत

प्रत्येकजण आपापल्या पक्षाचा विस्तार करत असतो. आम्हीदेखील करत असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसही करेल. कोणी कशा पद्धतीने लढायचे यावर कोणतीही चर्चा झालेली नसून ती योग्य वेळी होईल. सरकार पाच वर्षे चालवायचे यासाठी तिन्ही पक्षांची बांधिलकी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि दिल्लीतील नेतेही नेहमी ‘किमान समान कार्यक्रम’ हा सरकार चालवण्याचा मुख्य आधार असल्याचे सांगतात, याकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधतानाच मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही सर्व जण आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्षे चालणार, असे स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचे सरकार कसे चालवावे त्याचा उत्तम फॉर्म्युला महाराष्ट्रात आहे, असेही ते पुढे म्हणाले.

संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी

प्रताप सरनाईक यांचे कुटुंब त्रासात, अडचणीत आहे. भाजप पेंद्रीय यंत्रणांचा वापर करून विनाकारण त्रास देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावे असे त्यांनी सांगितले आहे. ते त्यांचे मत आहे. पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सर्वांशी बोलून घेतली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असून विनाकारण होणाऱया त्रासाचा सामना कसा करावा यासाठी संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे; परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या पेंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतार्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा कुटील डावसुद्धा यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेला कमकुवत करण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही हसन मुश्रीफ

काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात कुठेही शिवसेनेला कमकुवत करण्याचे काम करीत नाही. खरे पाहता आम्ही दोन्ही पक्ष महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मजबूत करण्यासाठी काम करीत आहोत. आमदार प्रताप सरनाईक यांनी अर्णब गोस्वामी आणि पंगना राणावतविरोधात हक्कभंग आणल्यापासून ते भाजपच्या रडारवर आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पेंद्रीय तपास यंत्रणांकडून छळले जात असल्याचेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होत आहे, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या