धारावीतील जमीन 5 हजार कोटींना उद्योगपतीच्या घशात घातली!

मुंबईतील मोक्याच्या जमिनी या उद्योगपतीला देऊन मुंबई लुटण्याचे भाजपचा डाव आहे. मुंबई विमानतळही याच उद्योगपतीच्या घशात घातले आहे. त्यापाठोपाठ धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी भाजप सरकारने शेकडो एकर मोक्याच्या जागेवरील जमीन 5 हजार कोटी रुपयांना एका उद्योगपतीच्या घशात घातली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यासंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यात येईल, असेही ते म्हणाले.

धारावीच्या पुनर्विकासाच्या मुद्दय़ावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. धारावीसाठी कोणती टेंडर प्रक्रिया पार पाडण्यात आली. कशाच्या आधारावर एवढी मोलाची जमीन देण्यात आली? राज्य व केंद्र सरकारने इतक्या अचानकपणे ही प्रक्रिया कशी पार पाडली? धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी दुबईच्या सी-लिंक कंपनीने 7 हजार 500 कोटी रुपयांची निविदा भरली होती, पण नंतर सरकारने ती रद्द केली. या पाठीमागे काय गौडबंगाल आहे? आणि आता 5 हजार कोटी रुपयांना प्रकल्पाचे काम कसे काय दिले, अशी प्रश्नांची मालिका पटोले यांनी उपस्थित केली.

केंद्राला पैसे देऊनही जागा नाही
महाराष्ट्र सरकारने रेल्वेच्या जमिनीसाठी 700 कोटी रुपये दिले होते; पण त्या वेळी रेल्वेने महाराष्ट्र सरकारला जमीन दिली नाही, आता असे काय घडले की ही जमीन राज्य सरकारला दिली? याची उत्तरे जनतेला दिली पाहिजेत, असे नाना पटोले म्हणाले.