देशात कोरोना वाढत असताना पंतप्रधान निवडणूक प्रचारात दंग – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात कोरोना वेगाने वाढत असताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संपूर्ण भारतीय जनता पक्ष फक्त पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात दंग आहे. केंद्रातील भाजप सरकारला कोरोनाचे काही सोयरसुतक नाही असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते, राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला असे नाना पटोले म्हणाले.

देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाच्या रूग्णसंख्येत दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रूग्णांची भर पडत आहे तर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसीवीर व ऑक्सीजनअभावी रुग्णांचे जीव जात आहेत आणि अंत्यसंस्कारासाठीसुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत असे विदारक चित्र देश उघडय़ा डोळ्यांनी पहात आहे. परंतु केंद्रातील भाजप सरकारला याचे काही सोयरसुतक नाही. देश कोरोनाच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. हा बेफिकीरपणाच आज देशातील जनतेच्या मुळावर उठला आहे अशा शब्दांत नाना पटोले यांनी हल्ला केला.