
>> विजय जोशी, नांदेड
मध्यंतरीच्या काळात विमानतळ दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्यानंतर ऐन मोसमात नांदेडहून सुटणार्या चार विमानसेवा बंद पडल्या. आता 15 नोव्हेंबरपासून नांदेड-मुंबई, नांदेड-गोवा अशा विमानसेवा सुरू होणार असे उर बडवून सांगणार्या भाजपच्या नेत्यांचे हसे झाले असून, अनिश्चित काळासाठी ही विमानसेवा आता लांबणीवर पडणार आहे.
नांदेडचे विमानतळ सध्या औद्योगिक विकास महामंडळाने रिलायन्सकडून ताब्यात घेतले आहे. त्यानंतर विमानतळ दुरुस्तीच्या नावाखाली मध्यंतरीच्या काळात नांदेडवरून सर्व विमानसेवा रद्द करण्यात आल्याने अनेकांची फजिती झाली. मात्र जिल्हाधिकार्यांनी विमान यात्रेकरूंच्या मागणीवरून तीन आठवड्यात विमानतळ सुरू केले. त्यामुळे नांदेड-पुणे, नांदेड-बेंगळुरू, नांदेड-हैदराबाद, नांदेड-दिल्ली (हिंडन) आदी विमानसेवा सुरू झाल्या. २७ ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करत आपल्या पाठपुराव्यानंतर नांदेड ते मुंबई व नांदेड ते गोवा अशी विमानसेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगून यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पुरावेही देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उड्डयनमंत्री के.राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आभारही मानले. त्यांची पोस्ट २७ ऑक्टोबरला व्हायरल झाल्यानंतर नांदेडचे खासदार अजित गोपछडे यांनीही आपणच यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगून मंत्रीमहोदयांना भेटल्याचे फोटोही व्हायरल केले. आता मुंबईला जाण्यासाठी नांदेडकरांना विमानसेवा सुरू होणार अशा बातम्या दोघांच्याही नावे प्रसिद्ध झाल्या. श्रेय घेण्यासाठी उर बडवून छातीठोकपणे विमानसेवेचे श्रेय घेणार्या मान्यवर मंडळीचे मात्र हसे झाले आहे.
विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार आता ही विमानसेवा अनिश्चित काळापर्यंत लांबणीवर पडल्याचे सांगून तांत्रिक कारणामुळे १५ नोव्हेंबरपासून या विमानसेवा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले.
स्टार एअरचे हे विमान नांदेड ते मुंबई, नांदेड ते गोवा अशी सेवा देणार होते. त्याचे वेळापत्रकही या पोस्टमध्ये नोंदविण्यात आले होते. स्टार एअरच्या व विमानसेवेच्या वेबसाईटवर पाहणी केली असता १५ नोव्हेंबरपासून कुठलीही विमानसेवा मुंबई किंवा गोवासाठी उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
घाईघाई करून श्रेय लाटण्याचा राजकीय मंडळींचा हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला असून, यामुळे मात्र हसे झाले आहे. शासनाचा कुठलाही जीआर किंवा वेबसाईटची माहिती घेवून आमच्यामुळेच झाले असे उर बडवून सांगणार्या सत्ताधारी राजकारण्यांचे मात्र यात हसे झाले आहे.



























































