
नांदेड जिल्ह्यातील नगर परिषदांचे व नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहा आणि मुखेड येथे जाहीर सभा होवून सुद्धा त्याठिकाणी भाजपाला अपयश मिळाले आहे. तर धर्माबादमध्ये भाजपा आमदार राजेश पवार यांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मराठवाडा जनहित पार्टीचा झेंडा रोवून आमदार राजेश पवार यांना आव्हान दिल्याने या निवडणुकीत चव्हाणांविरुध्द असंतोष पसरला आहे.
नांदेड जिल्ह्यातील १३ नगर परिषदांचे निकाल लागल्यानंतर बिलोली आणि धर्माबाद याठिकाणी भाजपाच्या बी टिमने मराठवाडा जनहित पार्टी नावाच्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवार उभे केले. धर्माबाद येथे तर भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध आमदार राजेश पवार यांना आव्हान दिले. बिलोलीत तर भारतीय जनता पक्ष चिन्हावर निवडणूक लढवू शकला नाही. या दोन्ही ठिकाणी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी मराठवाडा जनहित पक्षाच्या पाठिशी आपली शक्ती उभी केली. आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करुन याठिकाणी सभा घेण्याचे आवाहन केले होते. मात्र पक्षातील काही नेत्यांनी त्याला विरोध करुन केवळ मुखेड आणि लोहा येथे मुख्यमंत्र्यांच्या सभा घेतल्या. लोह्याची निवडणूक अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली, मात्र त्याठिकाणी विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जबरदस्त प्रचार करुन नगराध्यक्ष पदाची माळ प्राप्त केली.
घराणेशाहीला चपराक
लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत एकाच घरातील सहा उमेदवारांना भाजपाने उमेदवारी दिली. घराणेशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याची जबरदस्त चर्चा सबंध महाराष्ट्रात झाली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील सहा जणांचा या निवडणुकीत पराभव झाला. गजानन सूर्यवंशी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला. तसेच त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे अशा सहा जणांचा याठिकाणी पराभव झाला.
जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या यशाच्या व पराभवाच्या संदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी मराठवाडा जनहित पार्टी हि आमचीच आहे, मात्र स्थानिक पातळीवर उमेदवारी देताना झालेल्या मतभेदाबद्दल पक्ष पातळीवर चर्चा करुन काही स्थानिक आमदारांना या विजयाची जबाबदारी देण्यात आली होती, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीची जबाबदारी प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र भाजपाची बी टिम त्यांनी तयार केली. भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडून देता आले. एकंदरच या सर्व प्रकारामुळे शहर व जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची नाच्चकी झाली असून, किनवट व धर्माबाद मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला आहे.






























































