आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला, भर कार्यक्रमात मातंग समाज बांधवांची अशोक चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजी

अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलकांनी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सुरु असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर प्रचंड घोषणाबाजी करुन आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला, असा सवाल करुन मातंग समाज बांधवांनी आंदोलन केले.

नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण जात आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांना आरक्षणाच्या संदर्भात रोषाला सामोरे जावे लागत आहे. काल बंजारा समाजाने सारखणी येथे भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा ताफा अडवून घेराव घातला होता. बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत प्रचंड घोषणाबाजी केली होती. हा प्रकार संपत नाही तोच आज लोकस्वरज्य आंदोलन समितीच्या वतीने आज अशोक चव्हाण यांच्यासमोर प्रचंड घोषणाबाजी करत अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भात अगोदर बोला, आमच्या समोर मुख्यमंत्र्यांना बोला, गेल्या वर्षभरापासून आम्ही हे आंदोलन करत आहोत. १५ ऑक्टोबर रोजी आमचे मोठे आंदोलन होणार असून, आमदार व मंत्र्यांच्या घरासमोर दवंडी आंदोलन करण्यात येणार आहे. आमच्या समोर अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी आताच मुख्यमंत्र्यांना बोला, अशी मागणी करत प्रचंड घोषणाबाजी करुन आंदोलन केले.