
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसैनिक भडकले. अमरावती, कल्याण, नाशिक, सांगलीतील कार्यालयांवर शिवसैनिक धडकले. अनेक कार्यालयांवर जोरदार दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी नारायण राणे यांच्या पोस्टरला काळेही फासले.
अमरावती येथे शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने तेथील भाजपचे कार्यालय डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न संतप्त कार्यकर्त्यांनी केला.
सांगली शहरातही शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर असलेल्या पोस्टरवरील नारायण राणे यांच्या प्रतिमेला काळे फासले.
नाशिकमध्ये शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. या हल्ल्यात भाजप कार्यालयाच्या काचा फुटल्या.
कल्याणमध्ये शिवसैनिकांनी अहिल्याबाई चौकातील भाजपचे कार्यालय फोडले. यावेळी शिवसैनिकांनी भाजप पदाधिकाऱयाचे थोबाडच फोडले. राणेंच्या आक्षेपार्ह विधानाचे कल्याण शहर व ग्रामीण भागातही तीक्र पडसाद उमटले. आमदार विश्वनाथ भोईर व महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संतप्त शिवसैनिकांनी पुणे शहर भाजपच्या कार्यालयात कोंबडय़ा सोडून निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी बेताल वक्तव्य करणाऱया नारायण राणे यांचा तीक्र निषेध केला.


























































