ठरलं! नरेंद्र मोदी 30 मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहे. हिंदुस्थानचे 17 वे पंतप्रधान म्हणून मोदी 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये एनडीएला 352 जागांवर मोठे यश मिळाले. एकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदावर पुन्हा एकदा मोदींच्या नावाची मोहर उठली आहे. मोदींचा शपथविधी गुरुवारी, 30 मे रोजी पार पडणार आहे. शनिवारी एनडीएच्या संसदीय पक्षाची संसदेमध्ये बैठक पार पडली. यात एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली. यानंतर रात्री आठ वाजता नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला.

इतिहास घडला, बिगरकाँग्रेसी सरकार सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत

2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी अत्यंत भव्य समारंभ करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमासाठी ‘सार्क’ मधीलच्या देशांच्या प्रमुखांना आमंत्रण देण्यात आले होते. ज्यामध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा देखील समावेश होता. त्यामुळे यंदा होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. या सोहळ्यात कोणकोण सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.