
भुसावळ – देवळाली पॅसेंजर ट्रेनचे लवकरच मेमू ट्रेनमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच दोन-तीन दिवसात निफाडजवळील कसबे सुकेणे येथे गुड्स शेड सुरू होईल, अशी माहिती भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधला. सध्या भुसावळ ते देवळालीदरम्यान धावणाऱ्या पॅसेंजरचे मेमूमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. भुसावळला हे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होईल. सध्या पॅसेंजर मेंटेनन्स शेडमध्येच मेमूचे मेंटेनन्स केले जाणार आहे. लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक मंदावली आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतर गरजेनुसार ही ट्रेन इगतपुरी स्थानकापर्यंत चालविण्याचा विचार आहे. मेमूमुळे या मार्गावरील प्रवाशांना त्याच दरात जलद प्रवास करणे शक्य होईल, असे गुप्ता म्हणाले.
वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी श्रमिक ट्रेन, रेल्वे कोवीड हॉस्पिटल, वाहतूक, अन्नधान्य वाटप या कोरोना काळात केलेल्या कामांची माहिती दिली.
यावेळी वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, वरिष्ठ मंडळ सिग्नल अभियंता निशांत द्विवेदी, उपमुख्य अभियंता (निर्माण) रोहित थावरे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार हजर होते.
किसान रेल्वेला उत्तम प्रतिसाद
नव्या किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागणीनुसार फेऱ्या वाढवू किंवा रेल्वे नियमित करण्याचा विचार आहे.
मनमाड – मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार
मनमाड – इगतपुरीदरम्यान तिसऱ्या लाइनचा डीपीआर तयार होत आहे. इगतपुरी – कसारा या चौथ्या लाईनचे, तर कसारा – कल्याण पाचव्या लाईनचे सर्वेक्षण सुरू आहे. यानंतर मनमाड – मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.




























































