
जास्त पर्जन्यवृष्टीमुळे दक्षिणेकडील राज्यांमधील आवक घटल्याने देशांतर्गत बाजारपेठेत नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे दरात थोडीशी सुधारणा होऊन पिंपळगावला बुधवारी सर्वाधिक 2253 इतका प्रतीक्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही कमाल दर 1700 च्या पुढेच आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र दमदार पाऊस सुरू आहे. दक्षिणेकडील राज्यांमधील जास्त पावसामुळे तेथील कांद्याची आवक घटली आहे. श्रावण महिना संपल्याने उत्तरेकडेही मागणी वाढू लागली आहे. उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता चांगली असल्याने तो साठविण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कमी प्रमाणात कांदा लिलावासाठी येत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून दरात सुधारणा झाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.
पिंपळगाव बाजार समितीत बुधवारी आवक 12 हजार क्विंटल व दर किमान 1000, कमाल 2253 व सरासरी 1900 रुपये क्विंटल होते. त्याखालोखाल अंदरसूलला आवक तीन हजार क्विंटल व कमाल 2235, तर सरासरी दर 2 हजार रुपये क्विंटल होता. नांदगावला कमाल 2223, सरासरी 1721 व किमान 600 भाव मिळाला, तेथे आवक दोन हजार क्विंटल होती. इतर बाजार समित्यांमध्ये कमाल 1755 ते 2000, तर सरासरी दर 1600 ते 1900 रुपये क्विंटल दरम्यान आहेत.
जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील किमान, कमाल, सरासरी दर व कंसात आवक पुढीलप्रमाणे:
देवळा: 800-2030-1900
(4500 क्विंटल)
उमराणे: 551-2000-1700
(11,500 क्विंटल)
मनमाड: 1000-1775-1600
(3000 क्विंटल)
लासलगाव: 1000-1951-1725
(10,000 क्विंटल)
नामपूर: 1000-2000-1750
(12,000 क्विंटल)
सायखेडा: 700-1755-1650
(8000 क्विंटल)
वणी: 1100-2065-1675
(5000 क्विंटल)
येवला: 400-2042-1850
(3000 क्विंटल)
दिंडोरी: 1245-1900-1700
(200 क्विंटल)
सटाणा: 1000-1945-1750
चांदवड: 490-1936-1750.


























































