
रिंग रोडच्या जमीन मोजणीवेळी प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी मुंगसरे येथे घरात घुसून शेतकरी महिलांना अमानुषपणे मारहाण केली होती. या दंडेलशाहीविरोधात शेतकरी आणि शिवसैनिकांनी आज शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत दणका दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या देत आंदोलन केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. या दणक्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नाशिक शासकीय विश्रामगृह येथे आज रिंग रोड बाधित मातोरी, मुंगसरे, चांदशी, मखमलाबाद येथील शेतकऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. 2 मे रोजी प्रांताधिकारी दत्ता यांनी हातात दंडुका घेऊन महिला शेतकऱ्यांना कशी अमानुष मारहाण केली, त्याचे व्हिडीओच शेतकऱ्यांनी दाखवले. कमलाबाई खिरकाडे या 80 वर्षीय महिलेच्या हाताला मार लागला तर अनेकांच्या पाठीवर, अंगावर काळेनिळे व्रण उठले. शेतकऱ्यांची ही व्यथा ऐकल्यानंतर संजय राऊत यांनी तिथूनच दत्ता यांना फोन केला. दंडुका हातात घेऊन माता-भगिनींना मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असे विचारत त्यांना धारेवर धरले.
शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली तेव्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यालयात नव्हते. ते येईपर्यंत हटणार नाही, असे सांगत संजय राऊत यांच्यासह सर्वांनी तिथेच ठिय्या दिला. तासाभराने जिल्हाधिकारी आले. त्यांच्याशी अर्धा तास संजय राऊत यांनी चर्चा केली. मुजोर अधिकाऱयावर कारवाई करा. शेतकऱ्यांवर जबरदस्ती करू नका. आवश्यकता असेल तर रिंग रोडच्या मार्गात बदल करा, अशी मागणी त्यांनी केली.
बावनकुळेंचा फोन, प्रांताधिकाऱ्याला नोटीस
जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनाची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना फोन केला. स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या संतप्त भावना संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्याकडे मांडल्या. दरम्यान, आंदोलनाच्या धसक्याने पवन दत्ता याने कार्यालयातून आधीच पळ काढला होता.
यावेळी जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
हेच तुमचे महिला सुरक्षा धोरण आहे का?
भूसंपादनावेळी वृद्ध महिलांना मारहाण करा, असे आयएएस प्रशिक्षणावेळी शिकवले जाते का, हेच सरकारचे महिला सुरक्षा धोरण आहे का, हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारणार आहे. संसदेत याप्रश्नी आवाज उठवणार आहे, असे यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
महिला शेतकऱ्यांना मारहाण करणाऱया प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्याविरोधात शेतकरी आणि शिवसैनिकांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.



























































