चित्रपटातून वास्तव मांडताना दरवाजावर ईडीची टकटक होणार नाही याची काळजी घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वास्तवदर्शी चित्रपट करणाऱयांनी आपल्या कलाकृतीमधून समाजातील सध्याची गंभीर वास्तविकता मांडावी. पण अशा पद्धतीने मांडावी की तुमच्या दरवाजावर ईडीची टकटक होऊ नये किंवा तुमच्याविरोधात कोणी फतवा काढता कामा नये, असे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह म्हणाले. इराणी चित्रपट निर्मात्यांनी अधिकाऱयांच्या दडपशाहीला न जुमानता चित्रपट बनवले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी आणीबाणीच्या काळात व्यंगचित्रांतून परिस्थिती मांडली, याची आठवणदेखील त्यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना करून दिली.

एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी बॉलिवूड चित्रपटांबद्दल भाष्य केले आहे. शाह म्हणाले, हिंदी चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे झाल्याचा अभिमान वाटतो. पण आता मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केले आहे. सध्या चित्रपट निर्माते एकसारख्या विषयाभोवती फिरणारे चित्रपट बनवत असल्यामुळे हिंदी चित्रपटांमध्ये आता पूर्वीसारखा दम राहिलेला नाही. हिंदुस्थानी चाहत्यांना त्यांच्या मुळाशी आणि जन्मभूमीशी जोडलेले वाटते म्हणून जगभरात हिंदी चित्रपट पाहिले जातात. अशाच गोष्टी सुरू राहिल्या तर हे चित्र नक्कीच बदलू शकते, असेही ते म्हणाले.

चित्रपटांकडे फक्त पैसे कमावण्याचे साधन म्हणून पाहू नका
निर्मात्यांनी फक्त पैसा कमावण्याचे साधन म्हणून चित्रपटांकडे पाहणे सोडले तर बॉलीवूडच्या भवितव्याबद्दल सकारात्मक राहता येईल. पण आता उशीर झाला आहे. काही गंभीर विषय मांडणारे चित्रपट सध्या काही हजार प्रेक्षक पाहतात. असे काही चित्रपट येतील आणि हा प्रेक्षक वर्ग पाहील. पण हे किती काळ चालेल याची कल्पना नाही, असेही शाह म्हणाले.