राहुरी कृषी विद्यापीठाच्या सात नवीन वाणांना राष्ट्रीय मान्यता , विद्यापीठाकडून उन्नत वाण देण्याची परंपरा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी, दि. 8 (सा. वा.) – महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ऊस, गहू, ज्वारी, तूर फुले तृप्ती, तूर फुले कावेरी, तीळ व उडदाच्या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत या वाणांना मान्यता देण्यात आली. यामध्ये उसाचा फुले (कोएम 11082), गव्हाचा फुले अनुपम, रब्बी ज्वारीचा फुले यशोमती, तुरीचे फुले तृप्ती, तुरीचा फुले कावेरी, तिळाचा फुले पूर्णा आणि उडिदाचा फुले वसु या सात वाणांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने राहुरी कृषी विद्यापीठाने  शेतकऱयांसाठी उन्नत वाण देण्याची परंपरा कायम राहिली आहे.

राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संशोधन संचालक व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. सुनील गोरंटीवार, ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, डॉ. रामदास गारकर, गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके, ज्वारी सुधार प्रकल्पाचे डॉ. दीपक दुधाडे, शास्त्र्ाज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. संजीव पाटील, डॉ. सुमेरसिंग राजपूत यांच्यासह पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, निफाड येथील कृषी संशोधन केंद्र, ज्वारी सुधार प्रकल्प, कडधान्य सुधार प्रकल्प व तेलबिया संशोधन केंद्रातील सहकाऱयांनी या वाणांसाठी पुढाकार घेतला आहे.

 उसाचा फुले 11082-  हा लवकर पक्व होणारा वाण आहे. ऊस उत्पादनात 15.40 टक्के, साखर उत्पादन 13.52 टक्के उतारा असलेला हा वाण कोसी 67 पेक्षा सरस आहे. याला वाढीचा वेग जास्त असून, फुटव्यांची संख्या मर्यादित आहे तसेच वाढय़ावर कुस नाही. या उसाची मुळे जमिनीत खोलवर जाणारी तसेच मुळांचा पसारा अधिक असल्याने पाण्याचा ताण सहन करणारा व ऊस लोळण्याचे प्रमाण नगन्य असलेला हा वाण आहे. चाबूक काणी व पाने पिवळी पडणाऱया रोगास प्रतिकारक; तर मर आणि लालकूज या रोगांना मध्यम प्रतिकारक, खोडकिड, कांडीकिड आणि शेंडेकिडीस कमी प्रमाणात बळी पडणारा हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी सूचित करण्यात आला आहे.

 गव्हाचा सुधारित फुले अनुपम (एन.आय.ए.डब्ल्यू. 3624)-  या वाणाची महाराष्ट्रामध्ये नियंत्रित पाण्याखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. आकर्षक टपोरे दाणे, प्रथिनांचे प्रमाण 11.4 टक्के असून, तांबेरा रोगास प्रतिकारक्षम तसेच चपातीसाठी उत्तम वाण आहे. याचा पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस तसेच उत्पादन क्षमता प्रतिहेक्टरी 30 ते 35 क्विंटल असून, या वाणात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे.

 रब्बी ज्वारीचा फुले यशोमती (आर.एस.व्ही. 1910) –  हा वाण महाराष्ट्रातील रब्बी हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती लागवडीसाठी प्रसारित केला आहे. या वाणाचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी 9.3, तर उच्च उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी 12 क्विंटल आहे. हा वाण फुले अनुराधा व मालदांडी 35-1पेक्षा अनुक्रमे 8 टक्के आणि 19 टक्के अधिक उत्पादन देणारा आहे. या वाणाची पक्वता कालावधी 112 ते 115 दिवस आहे. या वाणाचे पांढरे शुभ्र टपोरे दाणे असून, हा खोड माशीला प्रतिकारक व खडखडय़ा रोगास मध्यम प्रतिकारक आहे.

 तिळाचा जे.एल.टी. 408-2 (फुले पूर्णा) – हा वाण महाराष्ट्रातील खान्देश आणि मराठवाडा विभागातील उन्हाळी हंगामासाठी प्रसारित करण्यात आला आहे. याचे उत्पादन प्रतिहेक्टर 705 किलो असून, यामध्ये तेलाचे प्रमाण 49 टक्के आहे. या वाणाचा पक्वता कालावधी 95 ते 100 दिवस असून, 1 हजार दाण्यांचे वजन 4 ग्रॅम इतके आहे. हा वाण पानावरील ठिपके व पूर्णगुच्छ रोगासाठी प्रतिकारक तसेच पाने गुंडाळणारी अळी व फळ पोखरणाऱया अळीसाठी सहनशील आहे.

उडदाचा पी.यू. 0609-43 (फुले वसू)-  हा वाण महाराष्ट्रातील उडीद पिकवणाऱया भागासाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणाची अधिकतम उत्पादनक्षमता हेक्टरी 19 क्विंटल आहे. या वाणाचा टपोरा परिपक्वता कालावधी 73 दिवसांचा आहे.

 तुरीचा फुले तृप्ती (पी.टी.10-1)-  हा वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत/बागायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रतिहेक्टरी 22.66 क्विंटल, तर उच्च उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी 32 क्विंटल आहे.  प्रचलित वाण फुले राजेश्वरी आणि बी.डी.एन.-711 या वाणांपेक्षा अनुक्रमे 33.45 टक्के आणि 42.97 टक्के अधिक उत्पादन देणारे आहे. या वाणाचा पक्वता कालावधी 165 दिवस आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक असून, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा कमी प्रादुर्भाव दिसून आला आहे.

 तुरीचा फुले कावेरी (पी.टी.11-4) –  हा वाण तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायत तसेच बागायत लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. या वाणापासून सरासरी प्रतिहेक्टरी 15.91 क्विंटल, तर उच्च उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी 24 क्विंटल आहे. प्रचलित वाण फुले राजेश्वरी या वाणापेक्षा 22.86 टक्के अधिक उत्पादन देते. या वाणाचा पक्वता कालावधी 164 दिवस आहे.