कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत धोरण निश्चित करा! राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे पालिकेला निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईची स्वच्छता, पाणीपुरवठा, साफसफाई आदी जबाबदारी मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी पार पाडतात. महापालिका प्रशासनाचा गाडा हाकण्यासाठी कर्मचारी हा खरा आधारस्तंभ आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी तातडीने धोरण निश्चित करा, असे निर्देश राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी दिले.

अनुसूचित जाती कर्मचाऱ्यांचे आस्थापनेतील आरक्षण व इतर विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी पारधी यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी वेगवेगळय़ा कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून अनुसूचित जाती कर्मचाऱ्यांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले. पुढे ते म्हणाले, जनतेप्रमाणेच कर्मचाऱ्यांचे प्रश्नदेखील योग्यरितीने सोडवले पाहिजेत. विशेषतः तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करावे, अशी सूचना पारधी यांनी केली. दरम्यान, बैठकांमध्ये चर्चा करण्यात आलेल्या बाबींचा एकत्रित अहवाल 30 दिवसांमध्ये पाठवावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी आयोगाचे संचालक काwशल कुमार, अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, सहआयुक्त मिलिन सावंत, सहआयुक्त आणि समन्वय अधिकारी विजय बालमवार, उपआयुक्त चंदा जाधव, सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे उपस्थित होते.