राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 22 हॉकीपटूंची निवड; 1 आणि 2 नोव्हेंबरला होणार ऑलिम्पिक पात्रता लढती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉकी इंडियाने येत्या 1 आणि 2 नोव्हेंबरला भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित ऑलिम्पिक पात्रता लढतीच्या संघनिवडीसाठी 22 हॉकीपटूंची राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी निवड केली आहे. उद्या सोमवारी हे  सर्व हॉकीपटू ओडिशाच्या कलिंगा स्टेडियममध्ये पार पडणाऱया निवड शिबिरासाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना रिपोर्ट करणार आहेत. हिंदुस्थानी संघाला ऑलिम्पिक पात्रता लढतीत रशियाशी खेळायचे आहे.

नुकत्याच झालेल्या बेल्जियम आणि स्पेन दौऱयात हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघांनी प्रभावी खेळ केला आहे. त्यांनी बेल्जियमला 3 कसोटींत तर स्पेनला 2 कसोटींत पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रता फेरीत हिंदुस्थानी हॉकी संघ जोरदार कामगिरी करील, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक रीड यांनी व्यक्त केला आहे.

हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी  पी. आर. श्रीजेश, कृष्णन पाठक, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, सुरेंदर कुमार, बीरेंद्र लाकडा, रूपिंदर पाल सिंह, गुरिंदर सिंह, अमित रोहिदास, कोथाजीत सिंह, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद, सिमरनजीत सिंह, आकाशदीप सिंह, रमनदीप सिंह, एस. वी. सुनील, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, गुरसाहिबजीत सिंह , शमशेर सिंह यांची निवड केली आहे.