बोनस कमी दिल्याने कर्मचाऱ्यांनी टोल उठवला! कंपनीला शिकवला धडा, 35 लाख रुपये बुडाले

दिवाळीत बोनस मिळण्यासाठी कर्मचारी वाट पाहतात, परंतु काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करतात. उत्तर प्रदेशातील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना केवळ 1100 रुपयांचा बोनस दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी झाली. मनासारखा बोनस न दिल्याने कर्मचाऱ्यांनी मालकाला आणि कंपनीला चांगलाच धडा शिकवला. यामुळे कंपनीचे कमीत कमी 33 ते 35 लाखांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवरील फतेहाबाद टोल प्लाझावर 21 कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना मागील वर्षी दिवाळीत 5 हजार रुपयांचा बोनस देण्यात आला होता, परंतु यंदा मात्र त्यांना केवळ 1100 रुपये बोनस देण्यात आल्याने ते कंपनीच्या व्यवस्थापनावर नाराज होते. बोनस न दिल्याचा वचपा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री 12 वाजेपासून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत टोल गेट उघडा करून ठेवला. यामुळे या कालावधीत किमान या मार्गावरून 5 हजार गाड्या विना टोलच्या गेल्या. कर्मचाऱ्यांनी या वाहनांकडून एक रुपयाचाही टोल वसूल केला नाही.

टोल प्लाझावरील सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीचा निषेध नोंदवण्यासाठी बूम बॅरियर्स उघडले आणि धरणे आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना खऱ्या अर्थाने दिवाळीचे गिफ्ट मिळाले. कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा जुरैल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर 10 टक्के पगारवाढ देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी कामावर परतले.

5 हजारांवरून 1100 रुपयांवर

मागील वर्षी टोल प्लाझा कर्माचाऱ्यांना 5 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता, परंतु यंदा केवळ 1100 रुपये बोनस दिला गेला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांनी 10 तास आंदोलन केले. या आंदोलनावेळी त्यांनी एकाही वाहनचालकाकडून टोल वसूल केला नाही. या टोल प्लाझावर 665 रुपये एकेरी टोल वसूल केला जातो. या टोल नाक्यावरून अंदाजे पाच ते साडेपाच हजार वाहने गेली. त्यामुळे पंपनीला 30 लाखांहून अधिक फटका बसला आहे.