
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा दोन ग्रामस्थांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बसागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील नेला कांकेर गावात ही घटना घडली. रवी कट्टम (25) आणि तिरुपती सोधी (38) अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघेही नेला कांकेर येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी धारदार शस्त्राने दोन ग्रामस्थांची हत्या केली. आम्ही घटनेचा तपशील पडताळत आहोत असे बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितले. सुरक्षा दल बस्तर प्रदेशात नक्षलवादविरोधी कारवाई तीव्र करत असताना हे हत्याकांड घडले. उसूर पोलीस ठाण्यातील पथके परिसरात पाठवण्यात आली आहेत आणि हल्ल्याच्या परिस्थितीची पुष्टी करण्यासाठी तपास सुरू आहे.



























































