आता बस्स झाले; विरोधी पक्षनेतेपदातून मला मुक्त करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये इतकी वर्षे काम करत असतानाही पक्ष संघटनेत पद मिळत नसल्याबद्दलची सल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज बोलून दाखवली. मला विरोधी पक्षनेतेपदात फार काही रस नव्हता; परंतु आमदारांच्या आग्रहाखातर मी हे पद स्वीकारले. एक वर्ष मी हे पद सांभाळले, पण आता बस्स झाले. मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा आणि पक्षसंघटनेत जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी ही मागणी केल्याने पवार काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळय़ात अजित पवार बोलत होते. मी इतकी वर्षे या संघटनेत सगळीकडे काम करतोय. एक वर्ष झाले. मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. ते सांभाळत असताना आता काहींचे म्हणणे आहे की, मी कडक वागत नाही. आता मी काय त्यांची गचुरी धरू की काय करू? कडक वागत नाही म्हणजे काय ते कळत नाही. त्यामुळे आता बास झालं. मला आता त्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची एखादी जबाबदारी द्या, मग कशा पद्धतीने पक्ष चालतोय बघा. अर्थात हा अधिकार नेतेमंडळींचा आहे. बाकीचे लोक इच्छा मांडतात. तशी माझीही इच्छा आहे. आता संघटनेत मला कुठलेही आणि कसलेही पद द्या, जे तुम्हाला योग्य वाटेल ते पद द्या. त्या पदाला मी न्याय देईन, असे अजित पवार म्हणाले.

शिंदे नुसती दाढी कुरवाळतात
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की, सतत माझ्यावर तुम्ही टीका करता. तुम्ही काम करत नाही. केवळ दाढी कुरवाळत बसतात. काम करा. मी कौतुक करेन. गुवाहाटी, गोवा फिरून आलात ते असले धंदे करायला आलात का ? आज विधान भवनमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोटय़वधी रुपये त्यांनी खर्च केले. आता गाडय़ांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिसतात. आता यांना आम्हाला बघायचे नाही तरी का दाखवता, अशा शब्दांत अजित पवार यांनी राज्यातील परिस्थितीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.