सभा, संमेलने कराल तर गुन्हे दाखल होणार, नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’चा सामना करण्यासाठी शहरात सभा, संमेलने, हळदी-कुंकू, विविध शिबिरे, चर्चासत्रे आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा बंदीचा आदेश डावलून सार्वजनिक कार्यक्रम करणाऱया आयोजकांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिला.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले की, नवी मुंबईत कोरोनाचे तीन रुग्ण सापडले आहेत. मात्र ते इथे राहणारे नाहीत, बाहेरून शहरात आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा झालेली नाही. महापालिका प्रशासनाने सध्या शहरात एकाही सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही. बेकायदा आयोजित होणाऱया कार्यक्रमांवर विभाग कार्यालयांना नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पालिकेने मनाई करूनही सार्वजनिक कार्यक्रम शहरात झाला तर आयोजकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

52 रुग्ण ‘होम कोरोन्टाईन’
शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली. 52 नागरिकांना आतापर्यंत ‘होम कोरोन्टाईन’ करण्यात आले आहे. वैद्यकीय पथक त्यांची दिवसातून तीन वेळा विचारपूस करीत आहे. कोरोन्टाइन वॉर्डमध्ये महापालिका, डी. वाय. पाटील आणि अपोलो रुग्णालयात एकूण 75 बेड ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी महापालिका रुग्णालयात 38 बेड आहेत, असे आण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले उपस्थित होत्या.