
सोलापूर शहर व परिसरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली असून, सुमारे अडीचशेहून सार्वजनिक शक्तीदेवी मंडळांकडून प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर 700हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, शहरात सार्वजनिक शक्तीदेवी मंडळांनी प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी केली आहे. सुमारे अडीचशेहून अधिक मंडळे प्रतिष्ठापना करीत आहेत. बाजारपेठांत पूजासाहित्य घेण्यासाठी गर्दी असून, बाळीवेस, मधला मारुती, टिळक चौक, अशोक चौक आदी परिसरात छोटय़ा व्यापाऱयांनी दुकाने थाटली आहेत. शहरातील अनेक देवी मंदिरांवर विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.
सोलापूर शहराची ग्रामदेवी रूपाभवानी मंदिर परिसराकडे जाणाऱया वाहतूकमार्गात बदल करण्यात आला आहे. 10 दिवस साजरा होणाऱया या उत्सवासाठी पोलिसांकडून प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 3 पोलीस आयुक्त, 22 पोलीस निरीक्षक, 42 सहायक पोलीस निरीक्षक, 55 फिक्स पॉइंट, सहायक पोलीस उपायुक्त, 564 अंमलदार, 160 होमगार्ड्स, 31 सेक्टर पॉइंट्स, 10 स्ट्रायकिंग असा 700हून अधिक पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे.
घटस्थापनेची वेळ
रविवारी घटस्थापनेने नवरात्राला प्रारंभ होत आहे. चित्रा नक्षत्र, वैधृती योग असला, तरी कर्मतिथी प्रधान असल्याने ब्राह्म मुहूर्तापासून पहाटे 5 ते दुपारी 1.45पर्यंत उत्तम मुहूर्त असून, घटस्थापना करून पूजन करता येणार आहे. अशौयामुळे किंवा इतर काही अडचणींमुळे ज्यांना उद्या (रविवारी) घटस्थापना करणे शक्य होणार नाही, त्यांनी अशौचनिवृत्तीनंतर 17 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर यांपैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व 23 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापना करावी व दसरा 24 ऑक्टोबर रोजीच साजरा करावा, अशी माहिती ‘पंचांग’कर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.
श्री भगवतीमाता मंदिरात जय्यत तयारी

श्रीक्षेत्र कोल्हार-भगवतीपूर येथील ग्रामदैवत श्री भगवतीमातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. राज्यभरातून भगवतीमातेच्या दर्शनासाठी येणाऱया भक्तांना सुलभ दर्शनासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे.
तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणुकामाता, वणीची सप्तशृंगीमाता आणि कोल्हारची भगवतीमाता देवींचे एकत्रित वास्तव्य आहे. या ठिकाणी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. श्री भगवतीमातेच्या नवरात्र महोत्सवानिमित्त नवरात्रकाळात दररोज देवीस अभिषेक झाल्यानंतर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी देवीदर्शन खुले होईल. त्यानंतर सव्वापाच वाजता काकड आरती, तर सायंकाळी सव्वासात वाजता महाआरती होणार आहे.
नवरात्रकाळात मंदिर गाभाऱयात आकर्षक पुष्पसजावट केली जाते. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या माळेपासून गावातील मानकरी परिवार वाजतगाजत देवीस साडी-चोळी नेसविण्यासाठी येतात. पाचव्या दिवशी कोल्हार येथील खर्डे-पाटील परिवार, तर सातव्या दिवशी भगवतीपूर येथील खर्डे-पाटील परिवारास परंपरेनुसार भगवतीमातेस साडी-चोळी नेसविण्याचा मान असतो. अष्टमीला देवीचा होमहवन (यज्ञविधी) प्रतिवर्षीप्रमाणे होतो.
मंदिर कळस, दीपमाळ, आतील सभामंडप, तसेच मंदिर परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. भगवतीमातेच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट, कोल्हार-भगवतीपूर ग्रामपंचायत, तसेच लोणी पोलीस प्रयत्नशील असल्याची माहिती देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे-पाटील यांनी दिली.
























































