
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागला आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने शरीफ यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून ८० लाख पौंड दंडही ठोठावला आहे. शरीफ यांची मुलगी मरियम यांना सात वर्षांची तर जावई निवृत्त कॅप्टन सफदर यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
गेल्या वर्षी पनामा पेपर लिक प्रकरणात नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव जाहीर झाले होते. पंतप्रधानपदावर असताना शरीफ यांनी भ्रष्ट मार्गाने अब्जावधी रुपयांची मालमत्ता जमविली. विदेशात खरेदी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी घातली. शरीफ यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणाऱया नॅशनल अकाऊंटिबीलीटी ब्युरोने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश मोहम्मद बशीर यांनी आज शिक्षा सुनावून शरीफ यांना दणका दिला आहे. शरीफ यांना १० वर्षे कारावास आणि ८० लाख पौंडचा दंड. शरीफ यांची मुलगी मरियम यांना सात वर्षे कारावास आणि २० लाख पौंड दंड तर जावई मोहम्मद सफदर यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली.
शरीफ लंडनमध्ये
पत्नी कुलसूम यांना कॅन्सर असून लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. नवाज शरीफ आणि मुलगी मरियम हे सध्या लंडनमध्ये आहेत. कुलसूम यांच्या आजारपणामुळे सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती शरीफ यांच्या वकिलाने केली होती, मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावीत आजच शिक्षा सुनावली.
२५ जुलैला निवडणूक
२५ जुलैला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यात शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग, भुट्टो यांचा ‘पीपीपी’आणि इम्रान खानचा ‘तेहरीक-ई-इन्साफ’ यांच्यात लढत आहे.

























































