हेडरी येथे सशस्त्र नक्षलवाद्यांनी ट्रक जाळला, पी.एल.जी.ए सप्ताहात दुसरी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गडचिरोली

एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-गट्टेपल्ली येथील 16 वाहनांची नक्षलवाद्यानी शुक्रवारी जाळपोळीची घटना ताजी असतानाच हेडरी उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या बाजूला ठेवल्या असलेल्या एका ट्रकला काल रात्रीच्या सुमारास सशस्त्र नक्षलींनी जाळले.

नक्षलवाद्यांचा 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर पर्यन्त पी.एल.जी.ए सप्ताह सुरू असतो. या कालावधीत नक्षली जाळपोळ व हिंसक कारवाया मोठ्या प्रमाणात करतात. कालची कारवाई उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या जवळच झाल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

एप्रिल महिन्यात पोलीसांच्या मोठ्या कारवाईत 40 नक्षली मारले गेल्यानंतर नक्षल चळवळ थंडावली होती. त्यांच्या कारवायांना लगाम घालण्यात पोलीस यशस्वी झाले होते. मात्र, जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवराजू कडे माओवादी कंम्युनिस्ट पक्ष्याच्या महासचिवाची सूत्रे गेल्यानंतर नक्षलींच्या हिंसक कारवाया वाढल्या आहेत.

बसवराजू हा आक्रमक व हिंसक कारवाया करण्यासाठी व या कारवायांचे नियोजन करण्यात माहीर समजला जातो. त्यामुळे कालच्या कारवाईने त्याचा इरादा जगजाहीर झाला आहे. येत्या काळात नक्षल्यांच्या हिंसक कारवायांना ऊत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे.