बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी निलंबित नगररचना सहसंचालकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याप्रकरणी निलंबीत नगररचना सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर, (वय 55 रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरूड) याला पुणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून मंगळवारी अटक केली. मागील अनेक दिवसापासून नाझीरकर हा पोलिसांना गुंगारा देत होता.

नाझीरकर याच्यावर दत्तवाडी व अलंकार पोलीस ठाण्यात तर मुंबईतील एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 2 कोटी 85 लाखाची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याप्रकरणी नाझीरकर यांच्यासह पत्नी व दोन मुलांविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

त्याने जमवलेली मालमत्ता कोठून व कशी जमवली याबाबत खुलासा करण्यासाठी एसीबीने सांगितले होते. त्यावेळी त्याने मिळून आलेली मालमत्ता बारामीत येथील परिसरात असलेल्या शेतीतून मिळाल्याचे सांगितले होते. तपासादरम्यान नाझीरकर याने सांगितलेली माहितीमध्ये तफावत मिळून आली. नाझीरकर याने माल विक्रीचे काही बनावट दस्तावेज तयार करून वापरले असल्याचे दिसून आले. याप्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात नाझरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार तपास सुरू असताना तो महाबळेश्वर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार नाझीरकरला पोलिसांनी ताब्यात मंगळवारी ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला बारामती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचीन काळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंगडे, काळे, कोकरे, कुंजीर, शेळके, नवले गायकवाड यांच्या पथकाने केली.