जम्मू-कश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ; इराणच्या अली खामेनी यांच्या हत्येवरून नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू आणि कश्मीर विधानसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या निषेधार्थ आमदारांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आंदोलन केले. घोषणाबाजी आणि पोस्टर्समुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या विषयावर चर्चेची मागणी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात संघर्ष निर्माण झाला.

नॅशनल कॉन्फरन्सच्या (NC) आमदारांनी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची हत्या आणि इराणमध्ये सुरू असलेल्या अमेरिका-इस्त्रायलच्या लष्करी कारवायांविरोधात जोरदार आंदोलन केले. आमदार घोषणाबाजी करत खामेनी यांचे पोस्टर हातात घेऊन उभे होते. भाजप आमदारांनी या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काँग्रेसचे आमदार इरफान हाफिज लोन आणि भाजपचे आमदार युधवीर सेठी यांच्यात झटापट झाली.

परिस्थिती शांत करण्यासाठी विधानसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व न२शनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी केले. तसेच त्यांनी इराणशी एकजूट व्यक्त केली. आमदार तनवीर सादिक म्हणाले, आम्ही इराणच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत. संपूर्ण नॅशनल कॉन्फरन्स आणि जम्मू-काश्मीर सरकार त्यांच्यासोबत उभे आहे. कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर हल्ला करण्याचा अधिकार नाही आणि हिंदुस्थानच्या सर्वोच्च नेतृत्वाने याचा निषेध केला पाहिजे.

सादिक यांनी यावर भर दिला की, खामेनी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष इराणच्या लोकांचे समर्थन करतो.यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या संघर्षाचा निषेध केला होता. लष्करी कारवाईद्वारे सत्तापरिवर्तन साध्य करता येत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.आपली राजवट निवडण्याचा अधिकार केवळ त्या देशाच्या नागरिकांनाच असतो. हवाई हल्ल्यांद्वारे राजवट बदल घडवून आणता येत नाही, असे अब्दुल्ला म्हणाले. त्यांनी खामेनी यांची हत्या हा बळाचा घोर गैरवापर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी, नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी सभागृहात स्थगन प्रस्तावही मांडला होता. विधानसभेच्या आवाराबाहेर कडक सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, परंतु आमदारांचे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरूच आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार उल्लंघनाविरुद्ध आणि निष्पाप लोकांच्या हत्येविरोधात आवाज उठवत आहेत.