
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी निपाणीतील एका प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. “राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. तो कर्नाटकात काय करणार”, अशी टीका फडणवीसांनी केली होती. या टीकेला राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “असे असेल तर मग देवेंद्र फडणवीस यांना आमच्या पक्षाची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही जर साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असू तर मग त्यांच्या समोर आता कोणी विरोधकच उरला नाही. कारण त्यांनी शिवसेनेची अवस्था काय केली ते पाहत आहात. काँग्रेस बद्दल देखील ते असच काहीतरी बोलतात.” अशी टीका पवार यांनी केली. साताऱ्यात सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले की, “कोणत्याही सत्ताधाऱ्यांना आमच्या सरकारला धोका नाही, असं सांगावं लागतं. त्यामुळे आम्ही प्रत्येक मताला उत्तर देऊ शकत नाही. फार महत्वाची बाब असेल तरच आम्ही उत्तर देऊ.”
राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “याबद्द्ल शरद पवार यांनी सांगितलं आहे. एकदा आमच्या राष्ट्रीय नेत्याने याबद्दल मत स्पष्ट केल्यानंतर दुसरा कोणीही त्याबद्दल काही सांगत असेल तर त्याला महत्व देण्याचं काही कारण नाही.”
“हे सरकार सत्तेत आल्यापासून शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा दावा यावेळी अजित पवारांनी केला. ते म्हणाले की, “कोरेगाव येथे पीएसआयची पोस्ट रिकामी आहे, तरी देखील तिथे कोणी पीएसआय द्यायला तयार नाही. या सरकारमुळे प्रशासनात एक मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. स्वतः अधिकारी याबद्दल सांगतात. पत्रकारांनीही अधिकाऱ्यांना खासगीमध्ये विचारायला हवं, नक्की काय परिस्थिती आहे, हे ते विश्वासाने सांगतील. फक्त त्या अधिकाऱ्यांचं नाव बाहेर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कारण शेवटी त्यांनाही काम करायचं असतं.”
“नव्याने बदल होण्याची शक्यता आहे असं मला वाटत. शरद पवार एक अनौपचारिक बैठक घेतील या बैठकीत प्रत्येकाचं मत जाणून घेतलं जाईल. रयत शिक्षण संस्थेच्या पुढील वाटचालीच्या दृष्टिकोनातून जे योग्य असेल तो निर्णय बैठकीतून घेतला जाईल.” असं यावेळी अजित पवार म्हणाले.
“ज्या सर्वसामान्य माणसाचा पक्षाशी काही संबंध नसतो तो माणूस या सरकारबद्दल काय बोलतो ते पहा. सरकारकडून 1 लाख 7 हजार कोटींची बिलं दिली गेली नाहीत. वेगवेगळ्या विभागांच्या कंत्राटदारांना थांबा थांबा असं सांगितलं जातं. ते कंत्राटदार आता हतबल झाले आहेत. ते अक्षरशः खचले आहेत. ते म्हणतात आम्ही आता सहन करू शकत नाही आणि आमची तेवढी ताकद नाही. त्यांच्यावर आर्थिक ताण आलेला आहे. मी देखील राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे काही आर्थिक ओढाताण असू शकते. जर कामं दर्जेदार होऊन कंत्राटदार बिलं मागत असतील तर ती द्यायला हवीत. मात्र काम दर्जेदार नसेल तर शेवटी तो जनतेचा पैसा आहे. अशावेळी त्याला महत्व देण्याचं काही कारण नाही.” असं यावेळी अजित पवार म्हणाले.
“राज ठाकरेंचं ट्विट फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं मला वाटत नाही. कर्नाटकच्या निवडणुकीबद्दल आता काहीही सांगता येत नाही आपण कोणीही ज्योतिषी नाही. सुरुवातीला काँग्रेसची स्थिती चांगली आहे असं सातत्याने मीडियात वाचायला मिळत होतं. आता बजरंग दलाचा मुद्दा घेतल्यानंतर तिथे आता बजरंगाची मूर्ती देण्याचं काम सुरु झालं आहे. याचा अर्थ भावनिक मुद्दा तयार करून निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न तेथील राज्यकर्त्यांचा दिसत आहे.” असे पवार म्हणाले.
“वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात. संविधानाचा आणि घटनेचा आदर करून त्या संघटना पुढे जाणार असतील तर त्या संघटना बंद करण्याचं कारण नाही. आपला देश सेक्युलर विचारांचा देश आहे. इथे सर्वधर्माची लोकं गुण्यागोविंदाने राहतात. अशाप्रकारे समजा समजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणीही करू नये. ज्याला त्याला आपल्या धर्माबद्दल चांगलं सांगण्याचा अधिकार आहे. पण त्यावेळी दुसऱ्या धर्माचा अनादर आणि त्या धर्माबद्दल द्वेष पसरविला जाऊ नये.” असं यावेळी पवार म्हणाले.


































































