दादांनी शरद पवारांसोबतच रहावं, पुन्हा पक्षात यावं; परतलेलेल्या आमदारांची विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
daulat-daroda-mla

अजित पवार यांचा आदेश पक्षाचा आदेश समजून त्यांच्यासोबत गेलेले आमदार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच आहोत असे म्हणत परतले आहेत. परतलेल्या आमदारांपैकी एक असलेले दौलत दरोडा यांनी अजित पवार यांनी देखील पक्षात पुन्हा परतावं आणि शरद पवारांसोबतच रहावं अशी विनंती केली आहे.

आम्ही शरद पवार यांना सोडून गेलोच नव्हतो. आम्ही अनवधानेने तिथे पोहोचलो होतो. असे असले तरी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच होतो आणि आहोत, असेही दरोडा म्हणाले. असे सांगतानाच त्यांनी शुक्रवारी रात्री, शनिवारी काय घडलं तो सारा घटनाक्रम देखील मीडियासोबत बोलताना सांगितला.

शक्रवारी रात्री 12 च्या दरम्यान आम्हाला अजित पवार यांचा फोन आला. त्यांचा फोन आल्यानंतर तो शरद पवार आणि पक्षाचाच आदेश आहे असे समजून आम्ही राजभवनावर गेलो. तिथे आम्हाला भाजपचेच नेते कार्यकर्ते जास्त दिसत होते. शिवसेना-काँग्रेससोबतची आपली बोलणी फिसकटली असून भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला असल्याचे आम्हाला सांगितले होते. शपथविधीनंतर आम्ही अजित पवार यांच्या घरी गेलो. तिथे नाश्ता झाला. त्यानंतर आम्हाला एका हॉटेलवर नेले. पण आम्ही गद्दारी केली नाही. आम्हाला सांगण्यात आलं की मोठ्या साहेबांनी सांगितेले आहे. म्हणून गेलो. आम्ही 5 आमदार होतो. आम्हाला दिल्लीला पाठवण्यात आले. तिथे गेल्यावर आम्हाला पुढील घडामोड कळली. पण आम्ही सतत शरद पवार यांच्या संपर्कात होतो. आम्ही पक्षाचा आदेश मानतो. आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत, असेही ते म्हणाले.

आता काय भूमिका घेणार असे विचारल्यावर ‘पक्षाच्या आदेशाप्रमाणेच शपथ घेऊ, पक्ष जो आदेश देईल तो शिरसावंद्य मानू. आम्ही पक्षाचा आदेश म्हणजेच शरद पवार यांचाच आदेश मानू’, असेही त्यांनी स्पष्ट केले.