अण्णांबद्दल बोलताना राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी चूक केली, अजित पवारांनी माफी मागितली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar

सामना प्रतिनिधी । नगर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. आमचे प्रवक्ते जर त्यांच्या विषय काही बोलले असेल जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

नगर येथे दाखल झालेल्या अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारेंवर टीका केली यावर प्रश्न विचारला. त्यावर पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्हाला अण्णा हजारेंबद्दल आदर आहे. ज्यांनी असे व्यक्तव्य केले आहे त्यांच्याशी आपण निश्चितपणे बोलू असे सांगून मी या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आम्हाला विषय वाढवायचा नाही असेही ते म्हणाले. अण्णा हजारे यांनी आमच्या काळातही आंदोलने केली होती. त्या वेळेला आम्ही त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रश्न सोडवले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे त्यांना भेटण्यासाठी जाणार होते. पण ते भेटले नाही आता मुख्यमंत्री भेटतील असे आम्हाला वाटते. मात्र सध्या अण्णांची प्रकृती खालावली आहे .सरकारने याची दखल घ्यावी, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे अध्यक्ष जयंत पाटील यांनी काल अण्णांची भेट घेण्यासाठी जाणार होतो, मात्र आम्हाला स्थानिक कार्यक्रमांमुळे उशीर झाला त्यामुळे तेथे जाता आले नाही. अण्णांनी आमची भेट नाकारली असे नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.