ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन् गावासाठी 30 लाखांचा विकासनिधी मिळवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा अन् गावासाठी 30 लाखांचा निधी मिळवा, अशी घोषणा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

कर्जत तालुक्यातील 56, तर जामखेड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोना महामारीने आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच आपल्याला खूप मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजूला ठेवून निवडणुकीसाठी होणाऱया खर्चास फाटा देत गावाच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आर्थिक खर्च वाचविण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांनाही संपुष्टात आणण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा अन् गावाच्या विकासासाठी आपल्या गावांना 30 लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद आमदार रोहित पवार यांनी घातली आहे.

बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठय़ा ग्रामपंचायतींना सीएसआर फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

…तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे!

zग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य काही मार्गांचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची गय केली जाणार नाही. असा प्रकार कुणी करू नये; अन्यथा गाठ माझ्याशी आहे! असा सज्जड दमच आमदार रोहित पवार यांनी दिला आहे