
विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून भाजपाचे डॉ. अशोक उईके यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरी येथील आमदार नरहरी झिरवाळ यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सायंकाळी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा करताच सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांनी झिरवाळ यांना सन्मानाने उपाध्यक्षपदाच्या आसनावर विराजमान केले.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार शनिवारी (14 मार्च) मतदान घेतले जाणार होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत सत्तारूढ पक्षाकडून राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ तर विरोधी पक्षाकडून डॉ. अशोक उईके यांनी अर्ज भरला होते. मात्र, आज दुपारनंतर अशोक उईके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. अध्यक्षांनी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ जेथे बसले होते त्या ठिकाणावरून विरोधी पक्षनेत्यांच्या शेजारी असलेल्या आसनावर त्यांना सन्मानाने विराजमान केले.





























































