
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत तब्बल 303 जागा जिंकून दणदणीत यश मिळवलेल्या ‘एनडीए’ने मुस्लिमबहुल 90 जागांपैकी 50 टक्के जागा जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘एनडीए’ला अल्पसंख्याकांविरोधी पक्ष म्हणवणर्यांची तोंडे त्यामुळे बंद झाली असून या जागांवर 2009 मध्ये ‘यूपीए’चे प्राबल्य होते.
2014 च्या तुलनेत यावेळी एनडीएला 79 मतदारसंघांत 41 हून अधिक जागा खेचता आल्या आहेत. काँग्रेसच्या वाट्याला त्यापैकी निम्म्याच जागा आल्या असून 2014 मध्ये ज्या ठिकाणी 12 जागा होत्या त्या ठिकाणी केवळ सहा जागांवरच यश संपादन करता आले आहे. मुस्लिम मतदारांनी यावेळी कुठल्याही एका पक्षाला भरभरून मतदान केले नसल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे. तसेच 27 मुस्लिम उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. जिंकणार्या मुस्लिम उमेदवारांमध्ये तृणमूल काँग्रेसचे पाच, काँग्रेसचे चार , समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रत्येकी तीन, भाजपचा एक, एमआयएमआयएमचे दोन, एलजेपी, एनसीपी, सीपीएम आणि एआययूडीएफच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे.
50 टक्के मुस्लिम लोकसंख्या असणार्या जिल्ह्यातही विजय
मालदामध्ये उत्तर भागात भाजपच्या खगेन मुर्मू यांनी तृणमूलच्या मौसम नूर यांचा दणदणीत पराभव केला. येथे 50 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. कूचबिहार येथील जागेवर भाजपच्या नीसिथ प्रमाणिक यांनीही चांगली कामगिरी केली. याशिवाय जलपाईगुडी, उत्तर दिनाजपूर जिह्याच्या बालुरघाट, बांकुरामध्ये विष्णुपूर लोकसभा, हुगली, वर्धमान-दुर्गापूर या जागांवरही भाजपच्या उमेदवारांनी चांगले यश मिळवले.
बंगालच्या अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यात मोठे यश
पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याकबहुल जिल्ह्यांमध्ये एनडीएला 18 जागांवर यश मिळाले. उत्तर दिनाजपूर जिह्यातील रायगंजमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या 49 टक्के आहे. येथे भाजपचे देबश्री चौधरी विजयी झाले. दरम्यान, विरोधी पक्षाने पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही प्रकारची विकासकामे केली नाहीत. तसेच निवडणुकीच्या काळात हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला होता.
























































