भाजपच्या लोकांनी मला मध्यरात्री घरातून उचलले, मानखुर्दमधील अपक्ष उमेदवाराचा आरोप

मुंबई महापालिका निवडणुकीतील मानखुर्द भागातील प्रभाग क्रमांक 135 मधील एका अपक्ष उमेदवाराने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या वॉर्डात मी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून भाजपकडून मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. माझ्याविरोधात साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप या अपक्ष उमेदवाराने केला आहे. लालू भाई वर्मा असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे.

लालू भाई वर्मा यांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार, भाजप नेते किरीट सोमय्या, मनोज कोटक व भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मला रात्री उशिरा बोलावून घेतले. मला मध्यरात्री 12 वाजता घरातून उचलून नेण्यात आले. पोलीस आयुक्त, जॉइंट सीपी व डीसीपी यांचे नाव घेऊन मला धमकावण्यात आले. माझ्या घराचा दरवाजा रात्रभर वाजवण्यात आला. मी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर माझ्या गाडीत चरस, गांजा किंवा अफू ठेवून मला खोटय़ा गुह्यांत अडकवले जाईल अशी धमकी देण्यात आली. लालू भाई व भाजप पदाधिकाऱ्यांत होणाऱ्या वादाचा एक व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनुसार, लालू भाई वर्मा भाजपचे उमदेवार नवनाथ बन यांना उद्देशून बोलत आहेत की, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन माझी हत्या करा. माझ्या मुलाबाळांना संपवाल. यापेक्षा अधिक काय कराल? तुम्ही काहीही केले तरी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असे बोलताना दिसत आहेत. किरीट सोमय्या यांनी मला मुंबईत राहू न देण्याची आणि व्यवसाय करू न देण्याची उघडपणे धमकी दिली आहे, असा गंभीर आरोपसुद्धा लालू भाई वर्मा यांनी केला आहे.