
हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने या वर्षी टोकियोत होणाऱ्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही स्पर्धा 13 ते 21 सप्टेंबर दरम्यान जपानच्या राजधानीत पार पडणार आहे. नीरज ओस्ट्रावा (झेक प्रजासत्ताक) येथे उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या गोल्डन स्पाइक ऍथलेटिक्स स्पर्धेत भाग घेणार असून या स्पर्धेतही मी माझा नैसर्गिक खेळ करेन, असे त्याने सांगितले.
नीरज चोप्राने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस डायमंड लीगमध्ये 88.16 मीटर भालाफेक करीत जर्मनीच्या जुलियन वेबरचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. दोन वेळचा ऑलिम्पिक पदकविजेता असलेल्या नीरजने सांगितले की, झेक प्रजासत्ताकचे दिग्गज खेळाडू जान झेलेझनी यांच्यासारखा प्रशिक्षक लाभणे आणि स्वतःची मेहनत यामुळेच चांगले निकाल मिळतील याची मला पूर्ण खात्री आहे. 90 मीटर थ्रो करण्याचा कोणताही ताण मी स्वतःवर घेऊ इच्छित नाही. कारण त्याचे यंदाच्या हंगामाचे मुख्य लक्ष्य टोकियोतील जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणे हे आहे. दोहा येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदा 90 मीटरची अंतर पार केले होते. या आपल्या प्रगतीवर तो अत्यंत समाधानी आहे. नीरज म्हणाला, ‘‘जान झेलेझनी या दर्जेदार प्रतिभावान प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभल्याने मी खूप आनंदी आहे. तांत्रिकदृष्टय़ा अजून थोडी सुधारणा केल्यानंतर मी सहज 90 मीटर पार भालाफेक करीन, असा विश्वास वाटतो. चेक प्रजासत्ताकमधील सराव सत्रे चांगली झाली आहेत. त्यामुळे ओस्ट्रावामध्ये माझ्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. या हंगामातील माझे मुख्य लक्ष्य नक्कीच टोकियोतील जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आहे.’’