नीटची परीक्षा रद्द, पेपर फुटल्याप्रकरणी सीबीआय करणार तपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट यूजी २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश केंद्र सरकारने सीबीआयला दिले आहेत.

एनटीएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “१० मे २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाच्या पुढील भाग म्हणून उमेदवार, पालक आणि जनतेला कळविण्यात येते की नीट (यूजी) २०२६ संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ८ मे २०२६ रोजी एनटीएने या प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कारवाईसाठी केंद्रीय यंत्रणांकडे माहिती सुपूर्द केली होती.”

एनटीएने पुढे म्हटले की, केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेली माहिती, तपास यंत्रणांचे निष्कर्ष आणि परीक्षेतील पारदर्शकता कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या मंजुरीनंतर ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून नव्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील.

राजस्थानातून पेपरफुटीचे आरोप

नीट यूजी २०२६ परीक्षा रविवारी, ३ मे रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर राजस्थानातून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी समोर आल्या. राजस्थान स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान एसओजीला हस्तलिखित स्वरूपातील एक ‘सजेशन पेपर’ मिळाला असून त्यातील १२० प्रश्न मूळ नीट प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे आढळले आहे. तपासात जीवशास्त्र विषयातील सुमारे ९० प्रश्न आणि रसायनशास्त्रातील ३० प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.