
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.
मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव दीड हजार बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यापैकी पाचशे बेड्स ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱयांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2 हजार 900खाटांसह एकूण 4 हजार 300 रुग्णांची या एकाच संकुलात सोय होऊ शकेल.
रेमडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे एक हजार व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत तर पुरेसा ऑक्सिजन जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्येही उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवडय़ात यात भर पडत आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरीक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेयाच्या सूचना देसाई यांनी दिल्या. यावेळी नेस्को कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त ( विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त (पी- दक्षिण) संतोषकुमार धोंडे तसेच महापालिका अधिकारी व अभियंता उपस्थित होते.
यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्ततपासणीबाबत थायरोबेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली.

























































