
पदवी महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करणाऱया प्राध्यापकांची स्थिती वेठबिगारासारखीच झाली आहे. या प्राध्यापकांना नेमणुकीपासून अतिशय तुटपुंजा पगार मिळत आहे. हे सर्व प्राध्यापक पोस्टग्रॅज्युएट असून नेटसेटधारक, तर काहींनी पीएच.डी.देखील मिळवली आहे. कायमस्वरूपी प्राध्यापक एकीकडे तीन ते चार लाख रुपये पगार घेत असताना तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची महिना 15 ते 20 हजारांवर बोळवण सुरू आहे. यातील काही प्राध्यापकांनी वेतनवाढीसाठी राज्यपालांसह उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना निवेदन दिले असून महिना 50 हजार रुपये पगार देण्याची मागणी केली आहे.
वडाळा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये 25 प्राध्यापक नेटसेट व पीएच.डी.धारक आहेत, मात्र हे शिक्षक मागील कित्येक वर्षांपासून तासिका तत्त्वावर तुटपुंजा पगारावर काम करीत आहेत, असे येथील प्राध्यापक डॉ. संजय खैरे यांनी सांगितले. महिना तीन ते चार लाख रुपये पगार घेणाऱया प्राध्यापकांना जेवढा अभ्यासक्रम शिकवावा लागतो तेवढाच अभ्यासक्रम तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना शिकवावा लागतो. त्यामुळे ही एवढी मोठी आर्थिक विषमता एका कॉलेजमधील प्राध्यापकांच्या पगारात पाहायला मिळते, असेही खैरे यांनी स्पष्ट केले.
तासिक तत्त्वावर काम करणाऱया प्राध्यापकांना इतर प्राध्यापकांप्रमाणे प्रत्येक महिन्याला पगार मिळत नाही. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या वेळी वर्षभर भरलेल्या तासिकांप्रमाणे या शिक्षकांना पगार दिला जातो. एखादी सुट्टी घेतल्यास तसेच दिवाळी, गणपती आणि उन्हाळी सुट्टीचा पगार इतर प्राध्यापकांप्रमाणे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळत नाही. वर्षाच्या बारा महिन्यांत 365 दिवस असून प्राध्यापकांना 192 दिवसांचा पगार मिळतो व उर्वरित 172 दिवस सुट्टय़ांचा कालावधी समजून पगार मिळत नाही. त्यामुळे या सुट्टीच्या दिवसांत काय खायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न प्राध्यापकांना पडला आहे.
ऐन दिवाळीत आंदोलनाचा इशारा
प्राध्यापकांचा तुटपुंजा पगार महिना सात ते आठ हजार आहे आणि तोही प्रत्येक महिन्याला मिळत नसल्यामुळे अनेक प्राध्यापकांची लग्ने जमण्यास अडचणी येतात. ज्यांचे विवाह झाले आहेत त्यांच्या घरात आर्थिक समस्येमुळे पत्नीही सोडून गेल्याची प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महिना पन्नास हजार रुपये तरी पगार देण्यात यावा. दिवाळीपूर्वी हा निर्णय घ्यावा, अन्यथा ऐन दिवाळीत आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, असा इशारा तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी दिला आहे.





























































