युनियन बँकेच्या नेट प्रॉब्लेमचा ग्राहकांना मनस्ताप

सामना प्रतिनिधी । कर्जत

नेरळ शहरातील बाजारपेठ येथे असलेल्या युनियन बँक शाखेत गेली आठवडा भरापासून इंटरनेट सेवा काही काळ बंद रहात असल्याने ग्राहकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. व्यवहार ठप्प होत असल्याने बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून अनेक वेळ ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत असल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गणपती उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने अनेकांना पैशांची गरज भासत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी करत असतात. परंतु नेरळ युनियन बँक शाखेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना पाहायला मिळत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेले अनेक दिवस इंटरनेट सेवेवर परिणाम झाल्याने बँक व्यवहार करताना अडचणी येत आहेत आणि त्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहेत. इंटरनेट सेवा बंद होत असल्याने बँकेत रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत.तसेच बँक मॅनेजर ही रजेवर गेल्याने याकडे लक्ष देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बँकेत प्रचंड गर्दी होते आणि त्याचा त्रास ग्राहकांना होत आहे. तरी बँक प्रशासनाने लवकरात लवकर मुख्य कार्यालयाला कळवून बँक व्यवहार सुरळीत करावा, अशी मागणी संतप्त ग्राहकांकडून केली आहे.